भाजपने विनाशाला सिद्ध व्हावे!
By Admin | Published: May 1, 2016 02:24 AM2016-05-01T02:24:06+5:302016-05-01T02:24:06+5:30
डिचोली : गोव्यात सध्या आर्च बिशपचे राज्य सुरू असून मातृभाषेचा सौदा करायला निघालेल्या विश्वासघातकी भाजपने येत्या
डिचोली : गोव्यात सध्या आर्च बिशपचे राज्य सुरू असून मातृभाषेचा सौदा करायला निघालेल्या विश्वासघातकी भाजपने येत्या जूनपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे सरकारी अनुदान बंद करण्याचा निर्णय घ्यावा. अथवा भाजपच्या आमदारांनी २ आॅक्टोबर २०१६ पर्यंत आमदारकीचे राजीनामे द्यावेत व पापक्षालन करावे. अन्यथा राजकीय विनाशाला सिद्ध व्हावे, अशा कठोर शब्दांत भारतीय भाषा सुरक्षा मंचचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी भाजपला साखळी येथील जाहीर सभेत आव्हान दिले.
भाभासुमंचे आंदोलन आता जनआंदोलन झाले असून गोव्याचे नागालँड व्हायला देणार नाही, असा इशारा
सरकारला देत वेलिंगकर यांनी राजेंद्र आर्लेकर यांनी याविषयी केलेल्या
वक्तव्याचे अभिनंदन केले. आंदोलनाची तीव्रता आता वाढत असून मतांसाठी
मातृभाषेचा सौदा करणाऱ्या, भाषाप्रेमींना फसविणाऱ्या भाजपाला आता जनता धडा शिकवेल, असे वेलिंगकर म्हणाले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री
फ्रान्सिस डिसोझा, साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना वेलिंगकर यांनी अजूनही वेळ गेली नसल्याचा पुनरुच्चार केला. मतांसाठी या नेत्यांनी लाचारी पत्करली असून मातेसमान असलेल्या मातृभाषांचा गळा घोटला असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी प्राचार्य रत्नाकर लेले प्रास्ताविकात म्हणाले, २०११ सालचा निर्णय बदलण्यासाठी आम्ही आंदोलन केले. सर्वांच्या सामर्थ्यांमुळेच काँग्रेस हटाव
मोहीम यशस्वी झाली. भाजप नेत्यांनी
भाषा मंचची फसवणूक व अपेक्षाभंग
केला आहे. विधेयकाच्या माध्यमातून
मागील दाराने सर्वच इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचे षड्यंत्र आखले होते. सुदैवाने भाभासुमंने बैठक घेऊन दोन दिवसांत आंदोलन उभारले. आतापर्यंत ८०० बैठका घेऊन जागृती केली आहे.
अॅड. स्वाती केरकर म्हणाल्या, बालपणापासून मायभाषेतूनच शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पार्सेकर मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी गोव्याच्या हिताचा निर्णय घ्यावा.
सभेस माजी मंत्री डॉ. सुरेश आमोणकर, संदीप परब, मगो नेते महेश गावस, प्रवीण ब्लेगन, भाऊदास नाईक, काँग्रेसचे नीळकंठ गावस, आनंद नाईक, विजयकुमार वेरेकर, दामोदर घाडी उपस्थित होते. आशिष ठाकूर यांनी भाषा सुरक्षा मंचच्या वाटचालीची थोडक्यात माहिती दिली.
व्यासपीठावर प्राचार्य सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, पुंडलिक नायक, नागेश करमली, स्वाती केरकर, श्यामसुंदर कर्पे, अनिल सामंत, रत्नाकर लेले, महेश गावस, दिनेश सहस्रबुद्धे, निशा पोकळे, शशिकांत नाईक, दामोदर नाईक, नगरसेविका रश्मी देसाई, अनंत परब, शांतीलाल आमोणकर, शशिकांत नाईक, दयानंद नाईक, धर्मेश सगलानी, रियाज खान, आत्माराम नाडकर्णी, कुंदा माडकर, मिलिंद रेळेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)