दक्षिण गोव्यासाठी भाजपची खास रणनीती; सर्वेक्षणाद्वारे घेतला प्राथमिक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:08 PM2023-12-11T15:08:54+5:302023-12-11T15:10:10+5:30

लोकसभेची जागा जिंकण्यासाठी विविध शक्कली लढवणार.

bjp special strategy for lok sabha election 2024 in south goa preliminary estimate taken by survey | दक्षिण गोव्यासाठी भाजपची खास रणनीती; सर्वेक्षणाद्वारे घेतला प्राथमिक अंदाज 

दक्षिण गोव्यासाठी भाजपची खास रणनीती; सर्वेक्षणाद्वारे घेतला प्राथमिक अंदाज 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दक्षिण गोव्याची जागा गमवायची नाही. यासाठी इरेस पेटलेल्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्थानिक नेतृत्त्वाला अंधारात ठेवून या मतदारसंघात प्राथमिक सर्वेक्षण करुन घेतल्याची खात्रिलायक माहिती समोर आली आहे.

अॅड. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर व विनय तेंडुलकर अशी तीन नावे आहेत. या सर्वेक्षणातून दक्षिण गोव्यात काय स्थिती आहे, याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय नेत्यांनी घेतला आहे. आमदार दिगंबर कामत यांनी याआधीच आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्याने त्यांचे नाव बाजूला पडले आहे. 

भाजपने यावेळी दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. केंद्रीय आयटीमंत्री राजीव चंद्रशेखर हे भाजपचे गोवानिवडणूक प्रभारी आहेत. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही दक्षिण गोव्याची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला जे मतदारसंघ गमवावे लागले होते, त्या मतदारसंघांवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. 

दक्षिण गोवा हा त्यातील एक. सासष्टीतील खिस्ती मतदारांची मते मिळवण्यासाठी निलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून हटवून दुसरीकडे बाबू कवळेकर यांचा फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत केपेतून पराभव झाल्यानंतर त्यांनी लोकसभेसाठी तयारी सुरु केली. अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात. तसेच दक्षिण गोव्यात त्यांनी लोकसंपर्क वाढवला आहे. सध्या आमदार वगैरे नसल्याने तेही इच्छुक असून काम करीत आहेत. 

राज्यसभेवर सदानंद शेट तानावडे यांना पाठवल्यानंतर विनय तेंडुलकर यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. पूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे. तसेच सावर्डेचे आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. काही काळ मंत्रीही होते. तेंडुलकर यांचेही नाव चर्चेत आहे. 

दरम्यान, उत्तर गोव्यात अनेक दावेदार निर्माण झाले असले तरी येथे भाजपशिवाय इतर कोणालाही जनतेचा कौल मिळणार नाही, अशी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाचीही ठाम भावना बनली आहे. विश्वजित राणे, रोहन खंवटे आदी मंत्री तसेच आमदार मायकल लोबो वगैरे मते मिळवून देतील, याची पक्षाला खात्री आहे.

काँग्रेसचे फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यात आले. दक्षिण गोव्यासाठी माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, राज्यसभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर
यांची नावे चर्चेत आहेत. सावईकर यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. प्रथमच त्यांच्या रुपाने भाजपला दक्षिण गोव्यात खासदार मिळाला होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या हा मतदारसंघ काँग्रेसकडे असून फ्रान्सिस सार्दिन खासदार आहेत. लोकसभेसाठी त्यांनी आपले काम चालूच ठेवले आहे.

भाजपचे लोकसभा विस्तारक सुनील कर्जतकर अलीकडेच गोव्यात येऊन गेले. त्याआधी निवडणूक प्रभारी राजीव चंद्रशेखर हेही येऊन गेले होते. पक्षाचे केंद्रीय नेते दर १५ ते २२ दिवसांनी गोव्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे विविध घटकांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उत्तरेतही डोकेदुखी वाढण्याची दाट चिन्हे

विद्यमान खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासाठी या मतदारसंघात पक्षातच प्रतिस्पर्धी निर्माण झालेले आहेत. दयानंद सोपटे, दिलीप परुळेकर, दयानंद मांदेकर यांनी उघडपणे दावा केला असून गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गोवा फॉरवर्डमधून भाजपात प्रवेश केलेले जयेश साळगांवकर हेही इच्छुक आहेत. उत्तर गोव्यातील उमेदवार कोण असेल? याबाबत उत्कंठा आहे.

जानेवारी महिन्यात करू उमेदवार चाचपणी: सदानंद तानावडे

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, असे कोणतेही सर्वेक्षण झाले असल्याची मला कल्पना नाही. माझ्या माहितीप्रमाणे जानेवारी महिन्यात एजन्सी नेमून उमेदवार चाचपणीसाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल नुकताच झालेला आहे. या राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडून शपथविधी वगैरे होईल. तसेच सध्या जे संसदेचे अधिवेशन सुरु आहे ते येत्या २२ रोजी संपेल व नाताळ, नववर्ष स्वागतानंतरच जानेवारीमध्ये सर्वेक्षण केले जाईल.


 

Web Title: bjp special strategy for lok sabha election 2024 in south goa preliminary estimate taken by survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.