तानावडे म्हणतात.... मी आहे तिथेच समाधानी; लोकसभा उमेदवारीबाबतच्या चर्चेवर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:31 PM2023-02-21T15:31:31+5:302023-02-21T15:33:19+5:30
लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार असा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावाची चर्चा असताना तानावडे यांनी मात्र मी आहे तिथेच समाधानी आहे', असे म्हटले आहे.
एका मुलाखतीच्या वेळी तानावडे म्हणाले की, 'विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मला थिवीतून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु, ती फोल ठरली. पक्षाने मला बूथ अध्यक्षपदापासून प्रदेश अध्यक्षपदापर्यंत पोहचविले. पंच, सरपंच, आमदारपद मी भोगले. प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी माझा चांगला समन्वय आहे. पक्षाने सध्या जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्यावर मी पूर्ण समाधानी आहे.'
लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार असा दावा तानावडे यांनी केला. श्रीपाद नाईक पाचवेळा निवडून आले आहेत. उत्तर गोवा मतदारसंघात प्रस्थापितांविरुद्धच्या लाटेचा पक्षाला फटका बसणार नाही का?, या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, 'अशी लाट आली तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. उत्तर गोव्यात आणि दक्षिणेतही भाजपचा उमेदवारच विजयी होईल.'
प्रदेशाध्यक्षपदाचा तीन वर्षांचा सर्वात कठीण काळ कोणता? असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, ‘माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मायकल लोबो आणि उत्पल पर्रीकर यांनी भाजप सोडला तो माझ्यासाठी कठीण काळ होता. पार्सेकर यांनी पक्ष सोडला तेव्हा मी फार भावनाविवश झालो होतो.
तानावडे म्हणाले की, 'लोबो यांनी पक्ष सोडू नये म्हणून अनेकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळी ते ऐकले नाहीत. कॉंग्रेस सत्तेवर येईल या समजुतीने त्या पक्षात त्यांनी प्रवेश केला व त्यांचे गणित चुकले.'
विधानसभेत पुरेसे संख्याबळ असताना आठ कॉंग्रेसी आमदारांना पक्षात प्रवेश देण्याची गरज का भासली? याआधी २०१९ मध्ये कॉंग्रेसच्या दहा फुटीर आमदारांना प्रवेश दिला. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी काही वाढली नाही, याकडे तुम्ही कसे पाहता? असा सवाल केला असता, तानावडे म्हणाले की, 'आमदार आमच्याकडे आले तरी त्यांचे मतदार आमच्याकडे वळणे तसे एकदम शक्य नसते. पक्ष मोठा व्हावा, यासाठी तसेच सत्तेसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. '
काही गोष्टी पक्ष हितासाठी विसरायच्या असतात....
२००५ साली दिगंबर कामत यांनी पक्षाला दगा दिला असतानाही त्यांना पुन्हा प्रवेश कसा काय दिला? या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, तो निर्णय केंद्रातून घेण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना सर्वात जास्त त्रास त्या सरकारने मला केला. परंतु, पक्षाच्या हितासाठी काही गोष्टी विसरायच्या असतात.
मतांची टक्केवारी वाढवणार
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मते ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या ३२ ते ३३ टक्क्यांपर्यंतच व्होट शेअर घुटमळत आहे. आम्हाला मतांची टक्केवारी वाढवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे काम चालू आहे.
'पार्सेकर, उत्पल यांचा निर्णय केंद्रीय नेतेच घेतील'
एका प्रश्नावर उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, लक्ष्मीकांत पार्सेकर किंवा उत्पल पर्रीकर यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याबाबत आमच्या हातात काहीच नाही. तो निर्णय सर्वस्वी पक्षाचे केंद्रीय नेतेच घेतील' असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"