भाजपा ते भाजप सोपटेंचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 08:25 PM2018-10-16T20:25:22+5:302018-10-16T20:25:35+5:30
सुबह का भूला श्याम को वापस अशा प्रकारचा प्रवास काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा सादर केलेल्या दयानंद सोपटे यांचा अद्यापपर्यंत राजकारणात झाला आहे.
- प्रसाद म्हांबरे
म्हापसा: सुबह का भूला श्याम को वापस अशा प्रकारचा प्रवास काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा सादर केलेल्या दयानंद सोपटे यांचा अद्यापपर्यंत राजकारणात झाला आहे. भाजपातून आपली राजकीय कारकिर्द सुरु केलेले सोपटे पुन्हा भाजपात डेरेदाखल झाले आहेत.
दयानंद सोपटे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला भाजपाचे युवा कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली. त्यानंतर भाजपात त्यांनी विविध पदेही भूषवली. त्यात भाजपा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी अशा विविध पदांचा त्यात समावेश होतो. कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य म्हणून ते उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर सुद्धा निवडून आले होते. तेथे केलेल्या कामांचा प्रभाव पक्षावर पडल्याने त्यांना २००७ सालची पेडणे मतदारसंघातील भाजपची उमेदवारी बहाल करण्यात आली. तत्कालीन काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार तथा तत्कालीन आमदार जितेंद्र देशप्रभू यांचा पराभव करीत ते पेडणेचे भाजपा आमदार झाले. त्यावेळी पहिल्याच लढतीत निवडून येण्यास सोपटे यशस्वी ठरले असले तरी पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्यांना विरोधात बसणे भाग पडले होते.
विरोधी पक्षातील आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत आपला प्रभावही पाडला होता. एक प्रभावी आमदार म्हणून आपला प्रभाव टाकलेल्या सोपटे यांनी २०१२च्या निवडणुकीपूर्व घडलेल्या राजकीय घडामोडीत भाजपचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. केलेला प्रवेश त्यांना बराच महागात पडला. माजी मुख्यमंत्री व त्यावेळीचे मांद्रे मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर काही काळ ते राजकारणा पासून दूर राहिले होते ते पुन्हा २०१७ सालच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत.
२०१७ च्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच मांद्रेतील उमेदवारी कोणाला मिळणार यावर बरीच चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस पक्षातर्फे दयानंद सोपटे यांच्या सोबत बाबी बागकर, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, सचिन परब हे या मतदारसंघातील उमेदवारीसाठी इच्छुक होते; पण पक्ष श्रेष्ठींनी शेवटी सोपटे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनी उमेदवारी दिली होती. दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यावेळी पार्सेकरांना कंटाळलेल्या काही भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना निवडून येण्यास सहकार्य केले होते.
तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवून दुसऱ्यांदा विधानसभेवर गेलेल्या सोपटे यांच्या पदरात विजय पडला होता. ४० आमदारांच्या विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवण्याचा मान काँग्रेस पक्षाला लाभला होता. विधानसभेवर काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून आले असले तरी इतर पक्षाच्या सहकार्याने भाजपे राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केल्याने पुन्हा विरोधात बसण्याची पाळी सोपटेवर आली होती. निवडणुकीनंतर मागील दीड वर्षाच्या काळात सोपटे हे काँग्रेस सोडणार अशी अफवा सुद्धा सुरू झाली होती. सुरू असलेल्या या अफवेला प्रत्येकवेळी नकार दर्शवला होता. आपण काँग्रेस पक्षात कायम राहणार असल्याचे जाहीर करीत सुद्धा केले होते. शेवटी त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सोपटे यांचे विधान खोटे ठरले असून, त्यांची अफवा मात्र सत्यात उतरली आहे. आपली राजकीय कारकीर्द भाजपातून सुरू करणारे दयानंद सोपटे हे पुन्हा भाजपात दाखल झाले आहेत.