गोवा सरकारला हादरा देण्याचा भाजपमधून प्रयत्न, मुख्यमंत्री रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 09:12 PM2018-10-05T21:12:07+5:302018-10-05T21:12:20+5:30
गोव्यात खनिज खाण अवलंबितांचे आंदोलन एकाबाजूने उग्र रूप धारण करू पाहत असताना दुस-या बाजूने गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले भाजपाचेच आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सरकारविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला.
- सदगुरू पाटील
पणजी : गोव्यात खनिज खाण अवलंबितांचे आंदोलन एकाबाजूने उग्र रूप धारण करू पाहत असताना दुस-या बाजूने गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले भाजपाचेच आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सरकारविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना लोबो यांनी टार्गेट केलेच. शिवाय गोव्यातील दोन्ही भाजप खासदारांना तुमचा पराभव अटळ आहे, असाही गर्भित इशारा दिला.
पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपप्रणीत आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, ती अस्वस्थता लोबो यांनी शुक्रवारी उघडपणे प्रकट केली. युवकांना सरकारी नोक-या मिळत नाहीत, नोक-यांच्या फाईल्स घेऊन मुख्यमंत्री बसलेले आहेत. प्रशासन पूर्ण कोलमडले आहे व लोकांचा भाजपाने अपेक्षाभंग केला आहे, असे लोबो यांनी पत्रकारांना सांगितले. सायंकाळी पणजीतील आझाद मैदानावर जिथे रोजगार संधी गमावलेले शेकडो खाण अवलंबित जमले होते, तिथे लोबो आले व त्यांनी आक्रमक शब्दांमध्ये सगळी अस्वस्थता व्यक्त केली. त्यावेळी खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
गरीब खाण अवलंबिताना पुन्हा पुन्हा अशा प्रकारे मैदानावर बसून आंदोलन करण्यास भाग पाडू नका, तुम्ही खासदार म्हणून काय काम करता, तुम्ही आतापर्यंत गोव्यातील खाण बंदीवर काहीच तोडगा काढू शकला नाही, असे लोबो म्हणाले. खाणींचा प्रश्न सुटला नाही तर तुम्ही दोघांनीही आणखी उमेदवारी अर्ज भरू नये, असा सल्ला लोबो यांनी दिला. खाण बंदीसाठी काँग्रेसला दोष देत बसू नका असाही सल्ला लोबो यांनी दिला. दरम्यान, लोबो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी मोठेशी काहीही सकारात्मक सुधारणा झालेली नाही असेही पत्रकारांना सांगितले. गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ आहे असेही लोबो म्हणाले.
लोबोंना मंत्रिपद हवे : विजय
भाजपप्रणीत आघाडी सरकारचा गोवा फॉरवर्ड हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. या पक्षाचे नेते व मंत्री विजय सरदेसाई यांनी मात्र मध्यावधी निवडणुका अशक्य आहेत असे सांगितले. आमदार लोबो हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कारण त्यांना सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेले नाही. त्यांना खरे म्हणजे मंत्रीपद मिळायला हवे व त्यांना ते मिळेलही. मात्र लोबो यांना ते कळत नाही व त्यामुळे ते अस्वस्थ होतात. सरकारी नोक-या अडल्या हा त्यांचा मुद्दा योग्य आहे पण येत्या 10-15 दिवसांत त्यावर उपाय निघेल व नोक-यांची प्रक्रिया सुरू होईल, असे मंत्री सरदेसाई म्हणाले.