मुरगावात भाजप विरुद्ध भाजप शाब्दिक युद्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2024 09:24 AM2024-03-05T09:24:27+5:302024-03-05T09:24:32+5:30

मिलिंद नाईक समर्थक नगरसेवक व आमदार आमोणकर यांच्यात वाद

bjp vs bjp verbal war in murgao | मुरगावात भाजप विरुद्ध भाजप शाब्दिक युद्ध 

मुरगावात भाजप विरुद्ध भाजप शाब्दिक युद्ध 

लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : माजी आमदार मिलिंद नाईक यांचे समर्थक आठ नगरसेवक आणि मुरगावचे विद्यमान आमदार संकल्प आमोणकर यांच्यात काही दिवसांपासून शाब्दीक युद्ध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी आमोणकर यांनी नाईक समर्थक नगरसेवकांवर आरोप केल्यानंतर सोमवारी (दि.४) त्या आठ नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आमोणकरांना लक्ष्य केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुरगाव मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे.

तीन दिवसांपूर्वी कोळसा प्रदुषण रोखण्याच्या विषयावर आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीएचे चेअरमन डॉ. विनोदकुमार नायर यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. बैठकीनंतर एमपीए कोळसा प्रदुषणावर रोखण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचे आश्वासन चेअरमन नायर यांनी दिल्याची माहिती आमोणकर यांनी पत्रकारांना दिली होती.

तसेच त्यांनी मुरगाव पालिकेत कोळसा प्रदुषणाचा विषयावर लढलेले नगरसेवक आपल्याबरोबर चेअरमनशी बैठकीला का आले नाहीत? असा सवाल उपस्थित केला होता. दोन दिवसापूर्वी हेच नगरसेवक चेअरमनला भेटून त्यांच्याशी कुठलीच चर्चा न करता फक्त चहा पिऊन गेल्याचा आरोपही आमोणकर यांनी त्या नगरसेवकांवर केला होता.

सोमवारी त्या आठ नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन संकल्प आमोणकर यांच्यावर आरोप केले. पत्रकार परिषदेस नगरसेवक लियो रॉड्रिगीस, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, नगरसेविका कुणाली मांद्रेकर, मंजूशा पिळर्णकर, नगरसेवक प्रजय मयेकर, दामोदर नाईक, दामोदर कासकर आणि नगरसेवक दयानंद नाईक उपस्थित होते.

संकल्प काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे होते त्यावेळी त्यांनी धार्मिक स्थळावर काँग्रेस सोडून अन्य कुठल्याच पक्षात जाणार नसल्याची शपथ घेतल्याचे लियो रॉड्रिगीस यांनी सांगितले. जिंकल्यानंतर सहा महिन्यात त्यांनी भाजपात प्रवेश केला. अशा प्रकारे देवाशी खोटारडेपणा करणाऱ्यांबद्दल न बोलले बरे, असा टोला रॉड्रिगीस यांनी लगावला. निवडणूकीपूर्वी संकल्प कोळसा बंद करणार असल्याचे सांगत होते. मात्र संकल्प आमदार बनून दोन वर्षे उलटली तरीसुद्धा कोळसा बंद झालेला नसून दुसऱ्यांदा त्यांनी लोकांशी खोटारडेपणा केल्याचा आरोपही रॉड्रिगीस यांनी पुढे केला.

कोळसा वाहतुकीला आमोणकरांचा आशीर्वाद

नगरसेविका कुणाली मांदेकर यांनी काही दिवसांपूर्वी आम्ही एमपीए चेअरमनला भेटून लोकहीताच्या दृष्टीने चर्चा करून उचित पावले उचलण्याची मागणी केल्याचे सांगितले. पूर्वी वास्कोतून ट्रकने कोसळा वाहतूक व्हायची, मात्र आज ती मुरगाव मतदारसंघातून होत असून आमदार आमोणकर यांच्या मुळेच तसे घडल्याचे दयानंद नाईक म्हणाले.

'त्यांचे' हात ओले

मुरगाव बंदरात स्थानिक नागरिकांना व्यवसाय नसल्याचे आमोणकर सांगत आहेत. त्यांनी स्वःता मुरगाव बंदरात एका बाहेरील कंपनीला व्यवसायासाठी आणलेले असून त्या कंपनीकडून त्यांचे हात ओले करण्याचा आलाचा गंभीर आरोपही रॉड्रिगीस यांनी केला.

 

Web Title: bjp vs bjp verbal war in murgao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.