'सावकारी' धोरण राबविणाऱ्या भाजपला कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत- गिरीश चोडणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 07:35 PM2020-10-10T19:35:20+5:302020-10-10T19:35:25+5:30
नवीन कायद्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मडगाव: भाजप पक्ष श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबवुन देशात "सावकारी" राजवट आणण्यात व्यस्त असुन, त्यामुळेच भाजप सरकारला गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. भाजपच्या ह्या धनाड्यांच्या प्रेमामुळेच भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राजभवनावरील काँग्रेसच्या भव्य मोर्चात सामील झालेले शेकडो कष्टकरी "शेतकरी" दिसले नव्हते अशी टिका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रिवण येथे किसान काँग्रेस तर्फे आयोजीत किसान मेळाव्यात बोलताना केली. या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपला जर शेतकऱ्यांचा खराच पुळका असता तर गोव्यातील ऊस, काजू, सुपारी, नारळ तसेच भातशेती करणाऱ्या गोमंतकीय शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या ऐकुन घेण्यासाठी मागच्या आठवड्यात गोव्यात भाजपची जाहिरतबाजी करण्यास आलेले केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर का भेटले नाहीत असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी यावेळी विचारुन, भाजपने आणलेल्या नव्या कायद्याने विवीध पिकांसाठी मिळणारी सरकारी आधारभुत किम्मत यापुढे बंद करुन शेतकऱ्यांना मोठ्या उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान भाजप सरकारने आखल्याचा दावा केला. या नवीन कायद्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
क्रोनी कॅपिटालीस्टांचे हित जपणाऱ्या भाजपला देशातला गरीब दिसत नसुन, या असंवेदनशील भाजपच्या कानावर सामान्यांच्या समस्या पडत नाहीत असा टोला खासदार फ्रांसीस सार्दिन यांनी यावेळी बोलताना हाणला. नवा कृषी कायदा आणल्याने "दलाली" बंद होणार असे सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना सदर कायद्यामुळे राज्य सरकारला ९ कोटी नुकसान होणार असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे " दलाल" वाटतात का हे त्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी काँग्रेस किसान मोर्चाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी केली.
यावेळीस्थानीक शेतकरी बोसत्यांव सिमोईस , सांगे गट काँग्रेस अध्यक्षा जोसफीना रोड्रीगीस ,विकेएसएस सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच जुझे आफोंसो यानी भाजप सरकारच्या किसान विरोधी कायद्यावर टिका केली. काँग्रेसचे प्रदेश सचिव रजनीकांत नाईक यांनी स्वागत केले तर सांगे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले.