भाजप ३४, मगो ९ जागा लढवणार
By admin | Published: February 28, 2015 01:58 AM2015-02-28T01:58:15+5:302015-02-28T02:03:08+5:30
पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली.
पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली. जिल्हा पंचायतीच्या ५० पैकी ३४ जागा भाजप, तर ९ जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केली. मंत्री मिकी पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला पाच, तर अपक्ष मंत्री आवेर्तान फुर्तादो व आमदार बेंजामिन सिल्वा यांना सासष्टीतील प्रत्येकी एक जागा भाजपकडून सोडण्यात आली आहे.
भाजपकडून मगो पक्षाला जिल्हा पंचायतीच्या नऊ जागा सोडल्या जातील, असे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’नेच दिले होते. उसगाव, बेतकी-खांडोळा, कुर्टी-खांडेपार, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बार्से, सांकवाळ, सांताक्रुझ आणि चिंबल हे जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्ष लढवणार आहे. उत्तर गोव्यातील सांताक्रुझ व चिंबल हे दोनच जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्षासाठी देण्यात आले आहेत. राज्यातील सत्ताधारी आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप उत्तर गोव्यातील २३, तर दक्षिण गोव्यातील ११ जागा लढवणार आहे. हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणे, शिरसई, अंजुणे, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, ताळगाव, खोर्ली, सेंट लॉरेन्स (आगशी), लाटंबार्से, सर्वण-कारापूर, मये, पाळी, होंडा, केरी, नगरगाव, बोरी, शिरोडा, दवर्ली, गिरदोली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, खोला, पैंगीण व कुठ्ठाळी हे मतदारसंघ भाजप लढवणार आहे.
मंत्री पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाला राय, नुवे, कोलवा, बाणावली व कुडतरी या पाच जागा देण्यात आल्या आहेत. वेळ्ळी आणि नावेली हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा व मंत्री फुर्तादो यांच्या उमेदवारांसाठी सोडण्यात आले आहेत.
मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर, ‘गोविप’चे पाशेको, अपक्ष मंत्री फुर्तादो, सिल्वा, पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार विष्णू वाघ, खासदार नरेंद्र सावईकर हेही पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
स्थैर्यासाठी २०१७ सालीही युती
भाजप, मगो पक्ष, गोविप, अपक्ष आमदार अशी युती आम्ही २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी केली होती. ही युती आता जिल्हा पंचायत निवडणुकीवेळीही आम्ही कायम ठेवली आहे आणि २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही ती कायम असेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. गोव्याला राजकीय स्थैर्य आहे.
जिल्हा पंचायतींना जास्त अधिकार व जास्त निधीही मिळेल. (खास प्रतिनिधी)