भाजपाकडून महिला केंद्रीत योजना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 03:31 PM2023-12-13T15:31:31+5:302023-12-13T15:32:20+5:30
म्हापसा येथे महिला मोर्चातर्फे पश्चिम विभागाची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने खऱ्या अर्थाने महिला केंद्रित योजना राबविल्या. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यापासून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम भाजपानेच केले. लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन अधिनियम-२०२३ हे दुरुस्ती विधेयक असो किंवा तीन तलाक विधेयक आणून मोदी सरकारनेच महिलांना आत्मसन्मान व न्याय देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मंगळवारी (ता.१२) म्हापसा येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात महिला मोर्चातर्फे पश्चिम विभागासाठी बैठक आयोजित केली होती. यामध्ये गोवा, महाराष्ट्र, दमण, गुजरात व मुंबईच्या महिला मोर्चा अध्यक्षा, सचिव तसेच पदाधिकाऱ्यांसाठी ही बैठक होती.
या बैठकीतून आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी महिलांसाठी कशा प्रकारे नियोजन आराखडा असावा, यादृष्टीने विचारविनिमय यावेळी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला पदाधिकारी सोनाली मोहिले यांना भाजपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश देण्यात आला. यावेळी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत, गोवा महिला मोर्चा अध्यक्षा सुलक्षणा सावंत, महाराष्ट्राच्या चित्रा वाघ, दमणच्या सिंपल कटेला, गुजरातच्या दीपिका सरदवा, मुंबईच्या शीतल गंभीर देसाई, तसेच आरती बांदोडकर या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, मोदी सरकारने वेळोवेळी महिला केंद्रीय योजना राबवून महिलांना ताठ मानेने जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या ७० वर्षांत हे कधीच झाले नसल्याची टीका त्यांनी केली. याशिवाय येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील महिला बचत गटांसाठी असलेला फिरणारा निधी वितरित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
'नारीशक्ती वंदन'ची अंमलबजावणी निवडणुकीनंतर
चित्रा वाघ म्हणाल्या की, मोदी सरकारने महिलांसाठी नारीशक्ती वंदन अधिनियम हे विधेयक आणले असून, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर याची अंमलबजावणी देशभर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे, महागाईचा मुद्दा हा फक्त राजकीय मुद्दा असून विरोधकांकडून त्याचा वापर केला जातोय, असे त्यांनी सांगितले.