खुशी आणि गम! उत्तरेत भाजप; दक्षिणेत काँग्रेसची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2024 10:13 AM2024-06-05T10:13:14+5:302024-06-05T10:15:00+5:30

विरियातो यांचा विजय समीप पोहोचला असतानाच भाजपाने फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळून लावली. 

bjp won in north goa and congress wins in south goa lok sabha election 2024 | खुशी आणि गम! उत्तरेत भाजप; दक्षिणेत काँग्रेसची बाजी

खुशी आणि गम! उत्तरेत भाजप; दक्षिणेत काँग्रेसची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: दक्षिण गोव्याचा निकाल भाजपासाठी धक्कादायक ठरला. सुरुवातीपासून विरियातो फर्नांडिस यांनी मिळवलेली मतांची आघाडी कायम ठेवत २ लाख १५ हजार ६७२ मते मिळवली तर पल्लवी धेंपे यांना २ लाख २६९ मतांपर्यंतच मजल मारता आली. आरजीचे रुबर्ट परेरा तिसऱ्या स्थानी असून, त्यांना १८,६७९ मते मिळाली आहेत. विरियातो यांचा विजय समीप पोहोचला असतानाच भाजपाने फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळून लावली. 

उत्तरेत श्रीपदा नाईक यांचे मताधिक्य विक्रमी ठरले. माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांचा त्यांनी दारुण पराभव केला. आरजीचे मनोज परब यांना ४४,५९८ मते मिळाली आहेत. सकाळी ८ वाजता दक्षिण गोवा मतदारसंघाची मतमोजणी कोंब, मडगाव येथील दामोदर वाणिज्य कॉलेज इमारतीत, तर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आल्तिनो-पणजी येथे सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या इमारतीत झाली. आल्तिनो मतमोजणी केंद्रावर १५७ टेबलांवर, तर मडगावच्या केंद्रावर १६१ टेबलांवर मतमोजणी झाली. दोन्ही ठिकाणी मतमोजणीच्या प्रत्येकी सात फेऱ्या झाल्या. त्यानंतर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी अधिकृतपणे निकाल जाहीर केला.

गोव्यात भारतीय जनता पक्षाची काल 'थोड़ी खुशी, थोड़ा गम' अशी स्थिती झाली. राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस मिळाले. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी भाजपच्या पल्लवी धेंपे यांचा पराभव केला. उत्तर गोव्यात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक मात्र विक्रमी मतांची आघाडी घेत जिंकले. श्रीपादभाऊंचा हा सलग सहावा विजय आहे.

नोटाला १०,९८३ मते

या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात मिळून १०,९८३ जणांनी नोटाचा अधिकार वापरला. नोटाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे दिसून आले.

कार्यकर्ता ते खासदार

कॅप्टन विरियातो हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच दक्षिण गोव्यात ओळखले जात होते. २०२२ साली दाबोली मतदारसंघात विरियातो विधान निवडणूक हरले होते. मात्र, त्यांना यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळाले व विरियातो जिंकूनही आले. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. विरियातो खासदार झाले आहेत. एखादा कॅप्टन खासदार होण्याची ही गोव्यातील पहिलीच वेळ आहे. 

पराभवाची कारणमीमांसा जनतेनेच करावी. मी माझे काम थांबवणार नाही. यापुढेही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात माझे काम सुरूच राहील. तसेच लेखनही मी सुरू ठेवणार आहे. - रमाकांत खलप, काँग्रेस.

दक्षिण गोव्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. तरीदेखील भाजपची मते वाढली आहेत. आमच्या उमेदवाराने २ लाखांपेक्षा जास्त मते मिळवली. पुन्हा डबल इंजिन सरकार झाल्याने लोकांना जी आश्वासने दिली होती, ती आम्ही पूर्ण करू. - सदानंद तानावडे, भाजप.
 

Web Title: bjp won in north goa and congress wins in south goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.