उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा दबाव; पणजीतून लढण्याचा सल्ला, नव्याने गाठीभेटी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:30 PM2021-09-20T14:30:12+5:302021-09-20T14:31:38+5:30
उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली.
पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवायलाच हवी असा आग्रह पणजीतील अनेक मूळ भाजप कार्यकर्त्यांनी धरला आहे. उत्पल सध्या कार्यकर्त्यांना व भाजपच्या पणजीतील मतदारांना भेटून त्यांचे मत आणि मन जाणून घेत आहेत.
उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. पणजीतील मतदारांना योग्य असा पर्याय हवा आहे. पणजीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. त्यांना स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्यानंतर योग्य असा प्रतिनिधी लाभलाच नाही. यामुळे त्यांनी उत्पलना ‘तुम्ही यंदा निवडणूक लढवाच’ असा सल्ला देणे सुरू केले आहे. काही कार्यकर्ते तर जास्त आग्रही आहेत.
पणजी महापालिका निवडणुकीवेळी काही भाजपनीष्ठांनीच भाजपच्या पेनलमधील उमेदवारांना मते दिली नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या तिकीटावर उत्पल यांनी गंभीरपणे दावा करावा व पक्षाने तिकीट दिले नाही तरीदेखील त्यांनी रिंगणात उतरावे असा सल्ला देणारेही कार्यकर्ते आहेत. पण स्वत: उत्पल यांनी तसे काही ठरवलेले नाही. उत्पल यांनी सध्या पणजीतील सर्व लोकांचे मत जाणून घेण्यासाठीच चर्चा चालवली आहे. यापुढे तर ते पणजीतील प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांना गटागटाने भेटतील अशी माहिती मिळाली. उत्पल हे भाजपच्या तिकीटावर दावा करण्यापूर्वी पक्षाच्या काही केंद्रीय नेत्यांनाही भेटणार आहेत.
मी कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात आहे व संवादही साधत आहे. चतुर्थीवेळी मी मळा व अन्य भागांतील बहुतांश भाजप मतदारांच्या घरी गेलो. यापुढे प्रत्येक बुथनिहाय मी गाठीभेटी वाढवीन. योग्यवेळी योग्य तो निर्णय होईल. कार्यकर्ते आग्रह करतात, ही गोष्ट खरी आहे.
- उत्पल पर्रीकर