भाजपची ख्रिस्ती मतेही फुटली नाहीत!
By admin | Published: February 18, 2015 01:55 AM2015-02-18T01:55:56+5:302015-02-18T01:58:51+5:30
पणजी : विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी पणजीत काँग्रेसने जातीयवादी प्रचार केला. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला;
पणजी : विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी पणजीत काँग्रेसने जातीयवादी प्रचार केला. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण ख्रिस्ती मतेही फुटली नाहीत. मला समाजाच्या सर्वच घटकांनी मते दिली. मतदारांचा विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवीन, असे पणजीचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी सांगितले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे-
प्रश्न : मनोहर पर्रीकर यांना पणजीतील ख्रिस्ती धर्मियांची जी मते मिळत होती, ती तुम्हालाही मिळाली काय?
उत्तर : मला सर्व घटकांची मते मिळाली. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी भाजपला मते दिली. त्यामुळेच ६५ टक्के मते मी मिळवू शकलो. ख्रिस्ती धर्मियांचीही मला खूप मते मिळाली. काँग्रेसचे काही माजी मुख्यमंत्री तसेच अन्य काही नेते पणजीत फिरले. अल्पसंख्याकांमध्ये अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला. पोटनिवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, तरी त्याचा लाभ काँग्रेसला झाला नाही.
प्रश्न : तुम्हाला कोणत्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रात कमी मते मिळाली असे वाटते?
उत्तर : आम्हाला सर्वच केंद्रांवर अपेक्षेप्रमाणे मते मिळाली. फक्त कांपाल येथील दोन बुथवर थोडी कमी मते प्राप्त झाली. त्या दोनपैकी एका बुथवर आम्हाला आघाडी मिळेल, असे आम्ही अपेक्षित धरले होते; पण शक्य झाले नाही.
प्रश्न : तुम्ही आता आमदार असल्याने यापुढे तुम्हाला मंत्रिपद दिले जावे, असे वाटते काय?
उत्तर : मी पक्षाकडे कधीच कोणते पद मागितले नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी स्वीकारली व काम केले. यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल त्यानुसार मी काम करत राहीन. मंत्रिपद किंवा अन्य कोणते पद मिळावे, अशी माझी अपेक्षा नाही. पणजीत झालेला माझा विजय हा पक्ष कार्यकर्त्यांचा विजय आहे. ते अडीच महिने प्रचंड वावरले. माझ्यावर पणजीवासियांनी दाखवलेला विश्वास ही साधी गोष्ट नव्हे. तो एक फारच मोठा विजय असून काँग्रेसला मिळालेली मते हा त्या पक्षाचा आजवरचा नीचांक आहे.
(पान २ वर)