सासष्टीत भाजपचे पानिपत, काँग्रेसची बाजी

By admin | Published: March 12, 2017 02:24 AM2017-03-12T02:24:42+5:302017-03-12T02:26:55+5:30

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव बलाढ्य सासष्टीने या वेळी खंबीरपणे काँग्रेसला साथ देताना भाजपचे सत्तेवर येण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याचबरोबर गोवा फॉरवर्ड

BJP's Panipat, the Congress's stand | सासष्टीत भाजपचे पानिपत, काँग्रेसची बाजी

सासष्टीत भाजपचे पानिपत, काँग्रेसची बाजी

Next

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव
बलाढ्य सासष्टीने या वेळी खंबीरपणे काँग्रेसला साथ देताना भाजपचे सत्तेवर येण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याचबरोबर गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादीशी युती केली असती तर ही महायुती गोव्यात सत्ता काबीज करण्याएवढी सक्षम झाली असती, हेही सिद्ध केले. सासष्टीतून या वेळी लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव व फिलीप नेरी रॉड्रिग्स या तिघांनी पुनरागमन केले तर काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यावरही पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणारे ज्योकीम आलेमाव केवळ ३३ मतांनी पराभूत झाले. दिगंबर कामत सातव्यांदा आमदार म्हणून जिंकून आले तर बाहुबली मिकी पाशेको यांना काँग्रेसचे विल्फ्रेड डिसा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या तालुक्यातील आठपैकी सहा मतदारसंघांत काँग्रेसचा विजय झाला.
भाजपने या वेळी मडगाव व फातोर्डा या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. भाजप कार्यकर्ते हे दोन्ही मतदारसंघ आपण जिंकल्यातच जमा असे सांगत सुटले होते. मात्र, दिगंबर कामत यांनी सातव्यांदा मडगावातून विधानसभेची निवडणूक लढविताना भाजपचे शर्मद रायतूरकर यांच्यावर ४,१७६ मतांनी विजय मिळविला. तर जवळच्या फातोर्डा मतदारसंघात विजय सरदेसाई यांनी भाजपचे दामू नाईक यांच्यावर १,३३४ मतांनी विजय मिळविला. सरदेसाई यांना १0,५१६ तर दामू नाईक यांना ९१८२ मते मिळाली.
बाणावलीत ‘आप’च्या रॉयोला फर्नांडिस यांनी चांगली कामगिरी केली असली तरी त्यांना चर्चिल आलेमाव यांची घोडदौड रोखता आली नाही. आलेमाव यांच्याकडून त्यांना ५,१९१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. चर्चिल आलेमाव यांना ९३७३ तर रॉयोला यांना ४१८२ मते मिळाली. आमदार कायतू सिल्वा यांना ३९९५ तर काँग्रेसचे एडविन बार्रेटो यांना २१५७ मते मिळाली.
नावेलीत लुईझिन फालेरो यांनी अपक्ष आवेर्तान फुर्तादो यांच्यावर २४५७ मतांनी विजय मिळवून पुन्हा एकदा विधानसभेत पाऊल टाकले. तर कुंकळ्ळीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष ज्योकीम आलेमाव यांना काँग्रेसचे क्लाफासियो डायस यांच्याकडून केवळ ३३ मतांनी पराभूत व्हावे लागले. मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी अपक्ष बेंजामिन सिल्वा यांच्यावर तब्बल ५२५३ मतांनी विजय मिळवून मागच्या निवडणुकीत बेंजामिनने मिळविलेला विजय फ्ल्यूक होता, हे सिद्ध केले.

Web Title: BJP's Panipat, the Congress's stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.