भावेश जांबावलीकर यांचा भाजपाचा राजीनामा; नवनाथ नाईकही मगोच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:09 PM2020-03-04T17:09:59+5:302020-03-04T17:11:39+5:30
रिवण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवर जांबवलीकर व नाईक या दोघांनीही दावा केला होता. मात्र त्या दोघांना डावलून ही उमेदवारी सुरेश केपेकर यांना देण्यात आली, त्यामुळे या दोघांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे.
मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या उमेदवारी वरुन सध्या गोव्यात भाजपात बंडाळी माजली असून रिवण मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारल्याने युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भावेश जांबावलीकर यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. दुसर्या बाजूने विद्यमान दक्षिण जिल्हा पंचायत अध्यक्ष नवनाथ नाईक यांनीही भाजपला रामराम ठोकून मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
रिवण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवर जांबवलीकर व नाईक या दोघांनीही दावा केला होता. मात्र त्या दोघांना डावलून ही उमेदवारी सुरेश केपेकर यांना देण्यात आली, त्यामुळे या दोघांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे. यातील जांबावलीकर यांनी आपण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे जाहीर केले आहे. त्यांचे बंड थोपविण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही प्रयत्न केला. मात्र आपण आपला निर्णय बदलणार नाही हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले.
जांबावलीकर हे १९९८ पासून भाजपाचे कार्यकर्ते असून युवा मोर्चासाठीही त्यांनी गोव्यात भरीव काम केले आहे. यंदा रिवण मतदारसंघ सर्व साधारण उमेदवारसाठी खुला असल्याने ही उमेदवारी मलाच मिळणार याची मला खात्री होती . मागच्यावेळी पक्ष नेत्यांनी मला टीएएसई आश्वासनही दिले होते पण शेवटच्या क्षणी माझे नाव गाळले गेले असे जांबावलीकर यांनी संगितले.
दुसर्या बाजूने नवनाथ नाईक यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना, मी मतदारसंघात केलेले काम पाहून तरी मला उमेदवारी द्यायला हवी होती असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, मला उमेदवारी न दिल्यास ती जांबावलीकर यांना द्यावी असे मी पक्षाला संगितले होते पण माझी तीही मागणी एकूण घेतली गेली नाही. त्यांना मगोची ऑफर आहे का असे विचारले असता ऑफर आहे पण मी अजून निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांना विचारूनच मी शेवटचा निर्णय घेईन असे त्यांनी सांगितले.