मगोपवजा सरकारसाठी भाजपचे जोरदार प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 01:44 AM2017-03-04T01:44:51+5:302017-03-04T01:54:16+5:30
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिलेला दगा आणि पुढील सरकारात मगोपचाच मुख्यमंत्री
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिलेला दगा आणि पुढील सरकारात मगोपचाच मुख्यमंत्री असण्याच्या त्या पक्षाकडून पुढे केलेल्या पूर्वअटीच्या पार्श्वभूमीवर भाजपही आक्रमक झाला आहे. त्यामुळे मगोपशिवाय सरकार स्थापन करण्याचे भाजपमध्ये तत्त्वत: ठरलेले आहे. त्यासाठी आतापासूनच भाजपने रणनीती आखली आहे. जे अपक्ष निवडून येऊ शकतील, अशांंच्या गाठीभेटी घेण्याचे काम भाजपमधील काही मंडळी सध्या करत आहे. येत्या ११ मार्चला, शनिवारी गोवा विधानसभेचा निकाल जाहीर होईल, त्यानंतर चित्र नेमके स्पष्ट होईल.
मगोपने गोवा सुरक्षा मंच पक्षाची साथ घेऊन आपल्याला दुखवल्याची भाजपच्या कोअर टीमची भावना बनल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांकडून मिळते. मगोपने केवळ प्रियोळ, फोंडा, मडकई व डिचोली, पेडण्यातच नव्हे तर हळदोणा, म्हापसा, सावर्डे, वाळपई, नावेली, दाबोळी अशा अनेक मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांची दमछाक करण्याचा प्रयत्न केला. काही मतदारसंघांमध्ये तर मगोपने मुसंडीही मारल्यासारखी स्थिती आहे. यामुळे आता सत्ता मिळाली तर मगोपला विरोधात बसविणे हे भाजपने प्रथम कर्तव्य मानले आहे. मगोपचे आमदार विरोधात बसले तर पाच वर्षांत या पक्षाचा शक्तिपात होईल, असे भाजपला वाटते. भाजपच्या कोअर टीमच्या बैठकीत यापूर्वी याविषयी चर्चाही झाली आहे. शक्यतो मगोपशिवायच सरकार स्थापन करावे, त्यासाठी प्रसंगी अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करण्याची संधी मिळाल्यास ती घ्यावी, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या पक्षातील इतरांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते. मगोपचे नेते सुदिन आणि दीपक ढवळीकर या बंधूंवर पर्रीकर आणि पार्सेकर खूप नाराज आहेत. निवडणूक प्रचारावेळी पर्रीकर यांनी प्रथमच ढवळीकर बंधूंना टार्गेट केले होते.
मगोपचा विस्तार झाला तर, भाजपच्या मतांमध्ये घट होत जाईल व त्यामुळे मगोपला सत्तेपासून दूर ठेवणे हा भाजपचा एक कलमी कार्यक्रम बनला आहे. अर्थातच मगोपला भाजपच्या चालीची कल्पना आलेली आहे. त्यामुळे मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी यापुढे प्रादेशिक पक्षांनीच सरकार बनवावे व राष्ट्रीय पक्षांचा त्यासाठी फक्त पाठिंबा घ्यावा, असे विधान केले आहे.
(खास प्रतिनिधी)