आघाडीतील धुसफुशीमुळे लोकसभेवेळी गोव्यात भाजपची कसोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 09:58 PM2018-01-24T21:58:24+5:302018-01-24T21:59:09+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी भाजप करत असतानाच...
पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीत स्व. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या वादावरून जी धुसफूस सुरू झाली आहे, त्याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीवेळी दिसून येण्याची दाट शक्यता आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने सध्या बंडाची भूमिका घेतलेली नाही पण या पक्षाचे मंत्री पुतळ्य़ाच्या विषयावरून अस्वस्थ झाले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी भाजप करत असतानाच गोवा फॉरवर्ड पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीवेळी आपले महत्त्व भाजपला दाखवून द्यायचे असे ठरवले असल्याची माहिती राजकीय सुत्रंकडून मिळाली.
स्व. सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेसमोर उभा करायलाच हवा, अशी भूमिका गोवा फॉरवर्ड पक्षाने कायम ठेवली आहे. भाजपला ही भूमिका मान्य नाही. तथापि, सध्या बंडाची भूमिका न घेता येत्या लोकसभा निवडणुकीवेळी गोवा फॉरवर्ड पक्ष आपले राजकीय उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी माहिती मिळते. काँग्रेसच्या काही आमदारांनाही तसेच वाटते. गोवा फॉरवर्ड पक्षाला सध्या तरी भाजपचे आमदार मायकल लोबो यांची साथ मिळाली आहे. लोबो यांच्यामार्फत सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव आणण्याचा प्रयत्न गोवा फॉरवर्ड करणार आहे याची भाजपला कल्पना आली आहे.
सध्या उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत पण काँग्रेसकडे व बिगर भाजप पक्षांकडे मिळून जास्त विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या जे बिगर भाजप मंत्री व अपक्ष सत्तेत आहेत, ते लोकसभा निवडणुकीवेळी आपल्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी मिळवून कशी काय देतील असा प्रश्न काही आमदारांमध्ये सध्या चर्चेत आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात यावेळी भाजपची जास्त कसोटी लागेल, असा सूर गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सध्या आहे. मगो पक्षातही तशाच प्रकारची चर्चा आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातही गोवा फॉरवर्ड, अपक्ष, मगोप यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उत्तरेत यावेळी काँग्रेस पक्ष कोणता उमेदवार उभा करील त्यावर बरेच काही अवलंबून आहे.
भाजपकडून मतदारसंघांचे वाटप (चौकट)
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भुपेंद्र यादव आणि राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस बी एल संतोष हे सध्या गोव्यात असून त्यांनी भाजपच्या सर्व मंत्री, आमदार, खासदार व प्रमुख पदाधिका:यांची बुधवारी
येथे बैठक घेतली. भाजपच्या प्रत्येक मंत्री, आमदार व खासदाराला यावेळी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघांची जबाबदारी वाटून देण्यात आली. या मतदारसंघांमध्ये भाजपच्या मंत्री व आमदारांनी लक्ष घालून तिथे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजवावी, अशी सूचना पक्षाने केली आहे. मंत्री मडकईकर याना ताळगाव, माविन गुदिन्हो याना कुडतरी, विश्वजित राणो याना पर्ये, प्रविण झाटय़े याना मडगाव, विनय तेंडुलकर याना फोंडा व काणकोण, नरेंद्र सावईकर याना शिरोडा, मायकल लोबो याना सांतआंद्रे, ग्लेन तिकलो याना नावेली, निलेश काब्राल याना केपे अशा प्रकारे आमदारांवर मतदारसंघांच्या जबाबदा:या दिल्या गेल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीकोनातून पक्ष संघटना काँग्रेसच्याही ताब्यातील मतदारसंघांमध्ये जास्त बळकट करावी असे ठरले आहे. मुख्यमंत्री र्पीकर हेही बैठकीला उपस्थित होते.