भाजपकडून ओबीसीचा फक्त निवडणूकांसाठी वापर, इंडिया आघाडीच्या ओबीसी नेत्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 15:18 IST2024-05-05T15:18:08+5:302024-05-05T15:18:20+5:30
गिरीश चोडणकर म्हणाले, पर्रीकरानंतर खासदार श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्री करणे गरजेचे होते, पण भाजपने पार्सेकर तसेच आता डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले.

भाजपकडून ओबीसीचा फक्त निवडणूकांसाठी वापर, इंडिया आघाडीच्या ओबीसी नेत्यांचा आरोप
- नारायण गावस
पणजी : केंद्रीय राज्य मंत्री तसेच सध्या भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना भाजप पक्षामध्ये काहीच स्थान नाही ते ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ठेवले आहे. भाजप ओबीसीचा फक्त निवडणूकांसाठी वापरत असून हा एक प्रकारे बहुजन समाजावर अन्याय आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी रविवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत, आपचे समन्वय ॲड. अमित पालेकर, सुनिल कवठणकर, अमरनाथ पणजीकर, धर्मा चोडणकार, चंद्रकांत चोडणकर तसेच अन्य बहुजन समाजाचे नेते उपस्थित होते.
गिरीश चोडणकर म्हणाले, पर्रीकरानंतर खासदार श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्री करणे गरजेचे होते, पण भाजपने पार्सेकर तसेच आता डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले. श्रीपाद नाईक हे आपल्या मुलालाही उमेदवारी तिकीट देऊ शकले नाही. भाजप फक्त ओबीसी बहुजन समाजाचा निवडणूकीसाठी वापर करत आहे. त्यांना बहुजन समाज पुढे गेलेला नको आहे. भाजप आणि आरएएसएस मिळून बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकांनी आता विचार करुन मतदान करावे. ॲड. रमाकांत खलप हे खरे बहुजन समजाचे हितचिंतक आहे. त्यांनी अनेक बहुजन समाजाचा लोकांना राजकारणात आणले आहे. बहुजन समाजाचे लोकांना यंदा ॲड. रमाकांत खलप यांना मोठ्या प्रमाणात मतदान करुन विजयी करावे.
ॲड. अमित पालेकर म्हणाले, श्रीपाद नाईक हे राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. एवढी वर्षे निवडून येऊन त्यांनी बहुजनांसाठी काहीच केले नाही. फक्त गटार बांधणे सभागृह करणे यासारखी कामे केली जात आहे. ही कामे एक सरपंच आमदारही करुन शकतो ही कामे खासदारांची नाही. भाजपने ओबीसी बहुजनांचा फक़्त वापर केला आता पुन्हा श्रीपाद नाईकच्या नावाने ओबीसी बहुजनांची मते मागितली जात आहे. त्यामुळे लोकांना आता जागृत होण्याची गरज आहे. या भ्रष्ट भाजप सरकारला आता पुन्हा सत्तेत आणू नये. कॉँग्रेस महाआगडीच्या दोन्ही उमेदवारांना यावेळी लोकांनी निवडून द्यावे असे ते म्हणाले.