दाबोळीत बांधकामांना एनओसीकरिता नौदलाकडून अडवणूक, राजनाथ सिंहांना तोडग्यासाठी साकडे!
By किशोर कुबल | Published: October 30, 2023 06:20 PM2023-10-30T18:20:02+5:302023-10-30T18:20:30+5:30
या प्रश्नावर लवकरच दिल्लीत विशेष बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन सिंह यांनी दिले.
पणजी : दाबोळीत बांधकामांसाठी नौदलाकडून ना हरकत दाखल्यांना अडचणी येतात याकडे स्थानिक आमदार तथा पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी काल गोवा भेटीवर आलेले केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष वेधले. या प्रश्नावर लवकरच दिल्लीत विशेष बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन सिंह यांनी दिले.
गोवा सागरी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी सिंह हे गोव्यात आले होते. दाबोळी विमानतळावर शिष्टाचारमंत्री या नात्याने त्यांचे स्वागत केल्यानंतर मॉवीन यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी हा विषय त्यांच्याकडे मांडला. दाबोळी विमानतळ नौदलाच्या ताब्यात असल्याने आजुबाजुच्या लोकांना लहानसहान बांधकामांसाठीही नौदलाकडून ना हरकत दाखला मिळवावा लागतो व ते अडचणीचे ठरते. बांधकामे यामुळे अडतात, अशा स्थानिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. विधानसभा अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर मॉविन यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती.
दाबोळी हा नागरी विमानतळ असला तरी नौदलाच्या ताब्यात आहे त्यामुळे तेथे नागरी विमानांसाठीही वेळेचे निर्बंध आहेत. मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने तूर्त प्रवाशांना थोडा दिलासा मिळालेला आहे. बांधकामांसाठी नौदलाच्या एनओसीचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन सिंह यांनी मॉविन यांना दिले. मॉविन म्हणाले की, विमानतळाच्या आजुबाजुला राहणाय्रांना बांधकामांसाठी नौदलाची एनओसी अनिवार्य केल्यामुळे लोकांना खूप त्रास आणि समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.’