कब्रस्तानातून मृतदेह गायब
By Admin | Published: March 5, 2017 02:25 AM2017-03-05T02:25:43+5:302017-03-05T02:29:02+5:30
डिचोली : कब्रस्तानात दहा दिवसांपूर्वी दफन केलेला मृतदेह गायब होण्याचा प्रकार मुजावरवाडा-साखळी येथे शनिवारी (दि. ४) उघडकीस
डिचोली : कब्रस्तानात दहा दिवसांपूर्वी दफन केलेला मृतदेह गायब होण्याचा प्रकार मुजावरवाडा-साखळी येथे शनिवारी (दि. ४) उघडकीस आला. त्यामुळे साखळी आणि परिसरात खळबळ माजली आहे. समाजमन संतप्त बनले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी मृतदेहाचा कब्रस्तानात शोध घेऊनही तो न मिळाल्याने तणाव कायम आहे. मृत व्यक्तीचे पुत्र ओसीम अत्तार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळवाडी-साखळी येथील अब्दुल करीम अत्तार (५६) यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्यावर मुजावरवाडा येथील कब्रस्तानात दफनविधी केले होते. अत्तार वीस वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. डिचोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २२ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास दफनविधी केले होते. त्यानंतर नवव्या दिवशी दफन विधीच्या ठिकाणी कुटुंबीयांनी फुले वाहण्याचा विधीही केला होता. फुले वाहण्याच्या विधीनंतर दहाव्या दिवशी (दि. ४ मार्च) रोजी कब्रस्तानात गेलेल्यांना संबंधित ठिकाणी उकरल्याचे दिसले. संबंधितांनी ही माहिती अत्तार यांच्या कुटुंबीयांना तसेच पोलिसांनाही दिली. पोलीस उपअधीक्षक रमेश गावकर, निरीक्षक नारायण चिमूलकर, डिचोलीचे प्रभारी उपजिल्हाधिकारी श्रीपाद आर्लेकर यांनाही या घटनेची माहिती दिली. साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, नगरसेवक रियाज खान आदींच्या उपस्थितीत दफनविधी केलेल्या जागी खोदले असता मृतदेह मिळाला नाही. दफनविधीवेळच्या केवळ फळ्या तेथे मिळाल्या. अन्य काहीही दिसले नाही. पोलिसांना तेथे हातमोजे मात्र मिळाले असून ते जप्त करण्यात आले.
(प्रतिनिधी)