गोमेकॉच्या शवागरातून तरुणाचा मृतदेह गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:50 PM2018-09-29T22:50:27+5:302018-09-29T22:50:43+5:30
बेवारस समजून लावली विल्हेवाट; कुटुंबियांवर आभाळ, गाव संतप्त
पणजी : ऐन तारुण्यात अवघ्या २४ व्या वर्षी निधन झालेल्या आपल्या कुटुंबाच्या सदस्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जातात तेव्हा त्यांना सांगण्यात येते की ‘हा मृतदेह शवागरात नाही, त्याची विल्हेवाट लावण्यात आले आहे‘. यावेळी काय परिस्थिती होईल त्या कुटुंबाची? ही कहाणी नसून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घडलेली वस्तुस्थिती आहे. बेजबाबदारपणाचा कळस ठरलेल्या घटनेत बेवारसी मृतदेह म्हणून भरत्याच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
२४ वर्षीय जानूझ पावेल गोन्साल्वस या हळदोणे येथील युवकाचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता. गोमेकॉत नेऊन त्याच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करण्यात आले होते. मृतदेह शवागरात ठेवण्यात आला होता. मयताच्या कुटुंबियातील एक सदस्य विदेशातून येईपर्यंत मृतदेह गोमेकॉतच ठेवला जाणार होता. त्याच दरम्यान २४ सप्टेंबर रोजी गोमेकॉतील कुणीही दावा न केलेले व नातेवाईकांच्या ओळखी पाळखी वगैरे न मिळालेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यावेळी जानूजच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
आधीच दु:खात असलेल्या कुटुंबियांवर या घटनेमुळे मोठा आघात झाला असून संपूर्ण गांव संतप्त बनला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीसांनी या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली आहे. अंत्यसंस्कार करायला मृतदेह नाही आणि अखेरचे दर्शन घेण्यासठीही मृतदेह नाही अशी परिस्थिती बनली आहे. असा प्रकार गोव्यात पहिल्यांदाच घडला आहे.
तिघे निलंबित, फौजदारी गुन्हे नोंद
या घटनेमुळे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख असलेले अॅडमंड रॉड्रिगीश यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या बरोबरच लॅब टेक्नीशन मच्छिंद्र जल्मी आणि अटेंडंट प्रकाश नार्वेकर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.