विष्णू वाघांचे पार्थिव रविवारी मैदानावर ठेवणार, स्मृती कायम जपू : मंत्री गावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:17 PM2019-02-16T19:17:40+5:302019-02-16T19:17:47+5:30
साहित्यिक व माजी उपसभापती स्व. विष्णू वाघ यांचे पार्थिव रविवारी पहाटेच विमानाने दाबोळी विमानतळावर येणार आहे.
पणजी : साहित्यिक व माजी उपसभापती स्व. विष्णू वाघ यांचे पार्थिव रविवारी पहाटेच विमानाने दाबोळी विमानतळावर येणार आहे. तिथून ते पार्थिव प्रथम ढवळी येथे वाघ यांच्या निवासस्थानी आणले जाईल आणि मग सकाळी नऊ वाजल्यापासून दयानंद बांदोडकर मैदान येथे ते अंत्य दर्शनासाठी ठेवले जाईल. ही माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी येथे जाहीर केली.
जीव्हीएम्स कॉलेजच्या जवळच बांदोडा येथे बांदोडकर मैदान आहे. सायंकाळी चार वाजता फोंडा येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी बांदोडकर मैदानावर लोकांनी पार्थिवाचे दर्शन घ्यावे, असे मंत्री गावडे म्हणाले. वाहतुकीची व गर्दी हाताळण्याची सगळी व्यवस्था सरकार करणार आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. ढवळी येथे घरीच जर शव ठेवले असते तर गर्दी आणि वाहतुकही हाताळता आली नसती. ढवळीचा उड्डाण पुल फक्त स्मशानभूमीवर जाणा-या वाहनांसाठी खुला केला जाईल, इतर वाहनांसाठी नव्हे, असे मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातीलही कवी, लेखकांना आम्ही कल्पना दिली आहे. गोव्यातील सगळे कलाकार व खेडय़ापाडय़ांतील लोक वाघ यांचे अंत्यदर्शन घेतील. अंत्यदर्शनाच्या ठिकाणी वाघ यांच्या कवितांची सीडी लावणे, संतुर वादन असे उपक्रमही ठेवलेले आहेत. कुणी तिथे वाघ यांच्याविषयी मनोगत व्यक्त करू शकतील किंवा वाघांची कविता सादर करू शकतील. वाघ यांची स्मृती कायम जपण्यासाठी सरकारकडून योग्य तो उपक्रम राबविला जाईल. आम्ही सर्वाच्या सूचना सध्या ऐकून घेऊ. निर्णय शेवटी सरकार घेईल, मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. मी स्वत:ही वाघ यांच्या हाताखालीच तयार झालेला कलाकार आहे. वाघ यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करावे की अन्य कोणता उपक्रम राबवावा ते सरकार योग्य प्रकारे निश्चित करील, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.