कोलवाळ येथे बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकनना गंडविणारी ३३ जणांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:25 AM2023-04-12T09:25:05+5:302023-04-12T09:25:58+5:30
क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; २६ संगणक, मोबाईल जप्त : ‘अमेझॉन कॉल सेंटर' नावाने सुरू होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: अमेरिकन लोकांना गंडविणाऱ्या ३३ जणांची टोळी क्राईम बँचने पकडली आहे. कोलवाळ येथे 'अमेझॉन कॉल सेंटर'च्या नावे सुरू असणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून हे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सोमवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात क्राईम ब्रँचकडून १५ पुरुष आणि ८ महिला मिळून एकूण ३३ जणांना अटक केली आहे. या कार्यालयातील २६ संगणक, मोबाईल, राउटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
कोलवाळ येथील 'कविश रेसिडेन्सी' या इमारतीच्या तळघरात हे बोगस कॉल सेंटर थाटले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मंडळी दोन महिन्यांपूर्वीच इथे आली होती आणि दोन महिन्यांपासून हे कॉलसेंटर सुरू करण्यात आले होते. अटक करण्यात आलेले सर्वजण गोव्याबाहेरील असून त्यात गुजरात, मिझोराम, छत्तीसगड, दिल्ली या राज्यातीलही आहेत. केवळ अमेरिकन लोकांना लक्ष्य करून त्यांना आर्थिक गंडा घालण्याचे काम या बोगस कॉल सेंटरमध्ये चालले होते, अशी माहिती क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली.
अटक करण्यात आलेले ठकसेन
जिगर परमार, नरेंद्रसिंग राठोड (गुजरात), अभिनव सिंग, नेहा कोथेकर, गिरीश खरात, प्रतीक चव्हाण, शाहरुख हुसेन, अमीर शेख (महाराष्ट्र), अजुंग रोकने (गुवाहाटी), सेम्युअल सायलो (मिझोराम), सिम्लेश फर्नांडिस, रोनाल्ड नॉग्लान, अँडर्सन मार्विन, बारी रिचर्ड, शेलॉन सोहतुम, मंगकरा मग्रुम, पैला मरिंग, संजना शाह, जेसिका खियांते, क्रीस डिसोझा, ज्युनेद अक्रम अली, जिप्सांग लिंगडोह, डेम दुनाई, पीटर राऊटे, (मेघालय), पाप्पा दास (आसाम), यापन्न शेरॉन, टी थांखान्सू (मणिपूर), थांग्लीस संथम, किंग वांग्ली, लेम शॉपिंग, मिमि नॉक्लांग, अरिम जमीर, (नागालँड), लालबियाक मावी (मिझोरम), अशी त्यांची नावे आहेत.
अशी करायचे फसवणूक
- संशयितांनी अमेझॉन या शॉपिंग अॅपवरून विविध मार्गांनी अमेरिकन खातेदारांची माहिती मिळविली होती. त्यात मोबाईल क्रमांकासह बँक संबंधित माहितीही होती.
- ही ठकसेन मंडळी अमेरिकन नागरिकांना फोन करून सांगायचे की, त्यांच्या अमेझॉन खात्यावरून महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑर्डर करण्यात आली आहे.
- जेव्हा खातेदार आपण कोणतीही ऑर्डर केलेली नाही, असे सांगायचा तेव्हा तुमचे खाते कुणी तरी हॅक केले असावे असे सांगून त्यांना घाबरावयाचे. त्यानंतर त्यांना मदत करण्याचे सांगून एका खात्यात पैसे जमा करायला सांगायचे जे पैसे या ठकांच्या खात्यात जायचे.
- या संदर्भात अमेरिकन लोकांनी तक्रारी केल्या तेव्हा चौकशी झाली आणि फोन गोव्यातून येत असल्याचे आयपी क्रमांका वरून स्पष्ट झाले.
- गोवा पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर क्राईम ब्रँचचे निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून या बोगस कॉल सेंटर- वाल्यांचा खेळ संपविण्यात आला.
गोवाच का?
अमेरिकन लोकांना टोपी घालण्याची हौस असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्यासाठी गोवाच का सापडतो हा चर्चेचा विषय बनला आहे. कारण यापूर्वीही असे दोन प्रकार घडले होते, त्यात बिगर गोमंतकीय यांनी गोव्यात येऊन अमेरिकन नागरिकांनाच फसविण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्यात आले होते.
कॉल सेंटरवर केलेली कारवाई ही चांगली गोष्ट आहे. पण त्या कॉल सेंटरशी आपले नाव जोडणे चुकीचे आहे. त्याच्याशी आपला कोणताच संबंध नाही. आपण ही जागा भाडेपट्टीवर ऑगस्ट महिन्यात दिली होती. त्यासंबंधीचा करारही केला होता. त्यांच्याकडून वेळेवर भाडेही दिले जात होते. मात्र, जो व्यक्ती बनावट कॉल सेंटर चालवत होता, त्यांचे नाव केलेल्या कारवाईतून समोर येणे गरजेचे आहे. - अँड. तारक आरोलकर, नगरसेवक, म्हापसा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"