बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून गोव्यातील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 04:14 PM2019-08-29T16:14:34+5:302019-08-29T16:18:16+5:30
गोव्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने गोव्याच्या मुख्यमंत्री निधीत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे.
पणजी : गोव्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने गोव्याच्या मुख्यमंत्री निधीत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांच्या पुढाकाराने ही देणगी मुख्यमंत्री निधीला मिळाली असून त्यासंबंधीचा धनादेश आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रदान करण्यात आला.
गेल्या पंधरवड्यात गोव्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने डिचोली, पेडणे, बार्देस तालुक्यातील गावामध्ये लोकांच्या घरांची हानी झाली तसेच केळीच्या बागायती शेती यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. पुराची झळ पोचलेल्या लोकांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदतीसाठी सरकार प्रयत्नरत आहे.
पूरग्रस्तांच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी महसूल खात्याने सर्वेक्षण केल्यानंतर 553 घरांचे अंशतः नुकसान झाल्याचे आढळून आले. या घरांना प्रत्येकी 9169रुपये मंजूर करण्यात आले असून एकूण 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे याशिवाय जीडीआरएफखाली त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळणार आहेत. या पुरात 12 घरांची पूर्णपणे हानी झाली. या घरांना प्रत्येकी 95,100 रुपये भरपाई महसूल खात्याने मंजूर केली आहे. तसेच पूरात दोघांचे बळी गेले या दोघांच्या जवळच्या नातलगाला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याशिवाय शेती, बागायतीची मोठ्या प्रमाणात झाली आहे सुमारे 77 लाखांची हानी ही केवळ केळी बागांची आहे.