बोंडला प्राणी संग्रहालयात देणार अधिक चांगल्या सुविधा - विकास देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 08:06 PM2020-02-28T20:06:28+5:302020-02-28T20:08:32+5:30
केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा बनण्याआधीच गोव्यात पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी वन्यजीव संरक्षणासाठी विशेष पावले उचलली होती.
- नम्रता देसाई
केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा बनण्याआधीच गोव्यात पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी वन्यजीव संरक्षणासाठी विशेष पावले उचलली होती. विशेषत: कृषी खाते व वन खात्याचा पदभार एकत्रित असल्याने त्यांनी कृषी खात्यासाठी संपादित केलेली जागा नंतर वन्यजीवांचा सततचा वावर पाहून वन खात्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आणि बोंडला अभयारण्य आणि कालांतराने बोंडला लघु प्राणी संग्रहालय आकारास आले. गोव्यातील वन्यजीव संरक्षणाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी सांगत आहेत उपवनसंरक्षक विकास देसाई.
प्रश्न - गोव्यातील अभयारण्यांच्या उभारणीनंतर त्यामध्ये बदल करणे आवश्यक झाले. यामागील कारणे काय आहेत?
उत्तर - गोव्यात अभयारण्यांची उभारणी करण्याच्या हालचाली केंद्रीय वनसंरक्षण कायदा बनण्याआधी झाल्या. आधी कृषी खात्यासाठी संपादित केलेल्या जागेत सतत गवा, बिबटय़ा, वाघ, रानडुक्कर असे अनेक वन्यजीव दिसायचे. नैसर्गिक तळ्य़ामुळे हे सर्व प्राणी इथे येतात आणि सध्या बोंडला अभयारण्य आहे तो निसर्गाने समृद्ध असा परिसर असल्याने तिथे बोंडला अभयारण्य आणि कालांतराने लघु प्राणीसंग्रहालय बनवण्यात आले. पण कालांतराने प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली.
केंद्रीय वनसंरक्षण कायदा आणि प्राणि संग्रहालयातील प्राण्यांसाठी असणा-या पिंज-यांसाठी मार्गदर्शिका प्रसिद्ध झाली. बोंडलामधील पिंजरे हे या मार्गदर्शिकेप्रमाणे नव्हते. आता गोवा वन खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याला सुधारित पिंजरे उभारणी करण्यासाठी व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी काम दिले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
प्रश्न - सध्या बोंडलामध्ये किती प्राणी प्राणीसंग्रहालयात बघायला मिळतात?
उत्तर - सध्या बोंडलामध्ये मुख्यत: पाच प्राण्यांसाठी पिंज-यांची रचना आहे. यामध्ये गवा, पट्टेरी वाघ, बिबटय़ा, पाणघोडा, हरीण या प्राण्यांसाठी पिंजरे आहेत. सध्या पट्टेरी वाघ आणि पाणघोडे प्राणी संग्रहालयात नाहीत. सध्या ८ गवे आणि ६ बिबटय़ा व काही हरीण आहेत.
प्रश्न - सध्या नव्या बोंडला विकास कामामध्ये होणारे बदल कधीपर्यंत पूर्ण होतील? तोपर्यंत प्राणिसंग्रहालय भेट देणा-यांसाठी खुले असेल?
उत्तर - बोंडला अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय सुरूच राहील. पिंज-यांचे काम जसजसे पूर्ण होईल त्यानुसार प्राण्यांना नवी जागा खुली करून दिली जाईल.
प्रश्न - प्राणी संग्रहालयात आणखी कोणते बदल केले जाणार आहेत?
उत्तर - सध्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. तसेच सध्या उपलब्ध नसलेल्या प्राण्यांना आणण्यासाठी सुधारित मार्गदर्शिकेनुसार पिंजरे असणे अनिवार्य आहेत. यामध्ये प्राण्यांना वावरण्यासाठी जागा, खाद्य खाण्यासाठी जागा आणि राहण्यासाठी आतमध्ये आणखी वेगळी जागा असे तीन भाग केले जातात. पिल्लांची संख्या वाढत जाते. त्यामुळे वाढणा-या प्राणी संख्येचाही यामध्ये विचार केला जात आहे.
प्रश्न - बोंडला विकास प्रकल्पासाठी एकूण किती खर्च होणार आहे?
उत्तर - विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला काम देण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजे १० ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने कळवले आहे. प्रत्येक पिंज-यासाठी अंदाजे २० लाख रुपये इतका सरासरी खर्च येतो. तसेच पाण्यसाठी सुविधा आणि इतर काही विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.
साधारणपणे वर्षभरात हे काम पूर्ण होऊ शकेल. मात्र या काळात प्राणी संग्रहालय बंद राहणार नाही. बांधकाम अथवा पिंज-यांच्या उभारणीमुळे संग्रहालयातील प्राण्यांना कोणताही त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. गरज वाटेल त्यावेळी त्यांना इतर पिंज-यातही हलवले जाईल. सध्या दोन प्राण्यांसाठीचे पिंजरे रिकामी आहेत. तिथेही या प्राण्यांना काही कालावधीसाठी गरजेनुसार हलवणे शक्य होईल.