बोरकरांच्या कवितांनी प्रेमकवितेलासुद्धा अध्यात्मिक मांगल्य दिले - प्रवीण दवणे  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 04:42 PM2024-01-07T16:42:08+5:302024-01-07T16:42:24+5:30

संमेलनात महाराष्ट्रासह आलेल्या विविध कवींसह गोमंतकीय कवींनी संमेलनात चांगलाच रंग भरला.

Borkar's poems also gave love poetry a spiritual touch says Praveen Daven | बोरकरांच्या कवितांनी प्रेमकवितेलासुद्धा अध्यात्मिक मांगल्य दिले - प्रवीण दवणे  

बोरकरांच्या कवितांनी प्रेमकवितेलासुद्धा अध्यात्मिक मांगल्य दिले - प्रवीण दवणे  

फोंडा : ‘कविवर्य बा. भ. बोरकर यांच्याकडून कानांचं श्रवण केलं जातं, डोळ्यांची दृष्टी केली जाते आणि देहांचा आत्मा केला जातो म्हणून त्यांची कविता श्रेष्ठ ठरते. बोरकर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या कवितेला असलेली अध्यात्मिक बैठकसुद्धा समजून घेतली पाहिजे. प्रेम कवितेलासुद्धा आध्यात्मिक मांगल्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या कवितेत आहे’ अशा शब्दात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी बोरकर यांच्या कवितेवर भाष्य केले. 

कोकण मराठी परिषद (गोवा) च्या वतीने रविवारी सकाळी बोरी येथील नवदुर्गा मंदिराच्या प्रांगणात आयोजित अठराव्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रवीण दवणे म्हणाले, ‘बोरकरांना पहिली कविता देवाच्या गाभाऱ्यात सुचली. म्हणूनच नंतर त्यांच्या कवितेचा गाभारा झालेला आम्ही सर्वांनी पाहिला. मरणाचासुद्धा महोत्सव करायचा असतो हे बोरकर आम्हाला शिकवतात. म्हणूनच पानगळसुद्धा ते आनंदाने स्वीकारतात. जीवन समृद्ध करायचे असेल तर त्यांचा हा विचार आम्ही आत्मसात करायला हवा. बोरकरांची कविता म्हणजे जगण्याचा रियाज आहे.’

रंगले कवी संमेलन
संमेलनात महाराष्ट्रासह आलेल्या विविध कवींसह गोमंतकीय कवींनी संमेलनात चांगलाच रंग भरला. जयसिंगपूर येथील प्रा.सुनंदा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सदर कवी संमेलन पार पडले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नारायण महाले व चित्रा क्षीरसागर यांनी केले. संमेलनात नंदिनी कुलकर्णी, चित्रा क्षीरसागर, पद्माकर कुलकर्णी ( सोलापूर) , संजय पाटील, अशोक लोटलीकर, रेखा डायस, मेघना कुरुंदवाडकर, दया मित्रगोत्री, लक्ष्मण पित्रे, प्रकाश क्षीरसागर, प्रमोद कारापूरकर, मोहनराव कुलकर्णी, डॉ. बसवेश्वर चेणगे (कराड), प्रा. प्रकाश जडे ( मंगळवेढा). 

चार पुस्तकांचे प्रकाशन 
चार पुस्तकांचे प्रकाशन रविवारी सकाळी झाले. वैशाली सूर्यवंशी यांचे ‘ड्यानीच्या दिशा आणि इतर गोष्टी’, मेघना कुरुंदवाडकर यांचे ‘आठवणीचा झुला’, गुरुदास नाटेकर यांचे ‘विचारधन’, ज. अ. रेडकर यांचे ‘चिमणीचं घरटं’ या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्रवीण दवणे, डॉ. सोमनाथ कोमरपंत, रमाकांत खलप, सागर जावडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: Borkar's poems also gave love poetry a spiritual touch says Praveen Daven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा