दोन्ही जागा देऊ, भिवपाची गरज ना! जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांना हमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:09 AM2023-04-17T10:09:44+5:302023-04-17T10:10:08+5:30
फर्मागुडी फोंडा येथे रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : 'गृहमंत्री अमित शाह यांनी निश्चिंत राहावे. गोव्याची जनता भाजपच्या कार्यपद्धतीवर खूश आहे. डबल इंजिन सरकारची ताकद जनतेला कळली आहे. इतर राज्यांची तुलना करता साधन सुविधांच्या बाबतीत आम्ही नवे मापदंड उभे करत आहोत. त्यामुळे आगामी लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही त्यांना देऊ. तुम्ही भिवपाची गरज ना. अशी हमी मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी दिली. फर्मागुडी फोंडा येथे रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
"केंद्राचे गोव्यावर अनेक उपकार आहेत. गोव्याला निधी देताना केंद्र सरकारने कधीच हात आखडता घेतला नाही. केंद्र खात्यातील प्रवेश परीक्षेसाठी कोकणी भाषेची मुभा देऊन सरकारने गोव्यातील युवकांवर उपकार केले आहेत. गोव्यातील युवक हे कधीही विसरणार नाहीत. स्वच्छ भारत सशक्त भारत हा मोदींचा मंत्र येथे गोव्यात आम्ही चांगल्या तऱ्हेने राबवत आहोत. म्हणूनच गोवा आज स्वच्छ व सुंदर दिसत आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दिल्लीतील व इतर राज्यांतील काही पक्ष लोकांना भूलथापा देण्यासाठी येतील, विधानसभेच्या वेळेसही काही लोक फुकट देण्याच्या वल्गना करत आले होते, तर काही लोक पाच हजार महिन्याला देण्याची भाषा करत आले होते. गोमंतकीय जनता लाचार नाही, हे लोकांनी मतदानातून दाखवून दिले व त्या सर्व पक्षांना गोव्यातून हद्दपार करण्याचे काम केले आहे. लोकसभा निवडणुकीतही जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन सावंत यांनी केले. तत्पूर्वी क्रीडा व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कृषी मंत्री रवी नाईक जलस्त्रोत आणि सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, वाहतूक आणि पंचायत राज मंत्री माविन गुदिन्हो, खासदार विनय तेंडुलकर, आमदार दिगंबर कामत व एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची यावेळी भाषणे झाली. माजी आमदार दामू नाईक यांनी सूत्रसंचालन केले.
'ते' सात जण स्वार्थी
आगामी काळात गोव्यात विरोधक है नावालाच राहतील. आता सध्याचे सात जण आहेत, त्यांना गोव्याचे काही सोयरसुतक नाही. स्वार्थी वृत्तीने ते विरोध करत आहेत. काही लोक निवडणुका जवळ आल्या की, जातीचे कार्ड वापरून राजकारण करत आहेत, त्या लोकांनी सरकारने त्यांच्यासाठी किती योजना मार्गी लावल्या, याचा अभ्यास करावा. उगीच जनतेला भडकावण्याचे काम करू नये, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
'आज भाजपचे मंत्री लोकांच्या दारी जात आहेत. काँग्रेसच्या काळात असे होत नव्हते. त्यामुळेच लोकांचा विश्वास वाढलेला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकांनी एक निष्क्रिय खासदाराला निवडून दिले. त्याचा त्यांना पश्चाताप होत आहे. त्यामुळेच दक्षिण गोव्यातही यावेळी लोक कॉंग्रेसपासून चार हा लांबच राहतील.' - सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष
भागच्या वेळच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा सध्या आमची ताकद कितीतरी पटीने वाढलेली आहे. दिग्गज असे नेते आज आमच्याकडे आहेत. त्यामुळे दोन्ही जागा वा भाजपलाच मिळतील, याबदल दुमत नाही. विजय जरी निश्चित असला, तरी प्रत्येक कार्यकत्यांन निवडणूक ही गांभीर्याने घेतली पाहिजे. आज जी मते आमच्याकडे आहेत, त्यामध्ये प्रत्येक कार्यकत्याने दहा अधिक मतांची भर घालायला हवी. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर विकासाचे नवे टप्पे या देशाला मिळाले. आत्मनिर्भर भारतसाठी योजना आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव आज उंचावलेले आहे. ते तसेच जर उंचावलेले ठेवायचे असेल, तर मोदी यांना पर्याय नाही. श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"