प्रश्न विचारण्याची समान संधी न दिल्यास बहिष्कार घालणार; सातही विरोधी आमदार सरकारविरोधात एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 08:41 AM2024-01-09T08:41:41+5:302024-01-09T08:43:31+5:30
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी काल अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधी आमदारांची बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनात सभापतींनी सत्ताधारी व विरोधकांना प्रश्न विचारण्याची समान संधी न दिल्यास अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा सर्व सातही विरोधी आमदारांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी काल अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधी आमदारांची बैठक घेतली. काँग्रेसचे तिन्ही आमदार, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आपचे आमदार वेंझी व्हिएगश व कुझ सिल्वा तसेच आरजीचे आमदार वीरेश बोरकर बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना युरी म्हणाले की, सभापतींनी सत्ताधारी व विरोधी आमदारांचा आलटून पालटून एकेक प्रश्न घेण्याची पद्धत येत्या अधिवेशनात बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. तसे केल्यास आम्ही सर्व विरोधी आमदार या अधिवेशनावर बहिष्कार घालू, दोन्ही बाकावरील आमदारांना प्रश्न विचारण्याची समान संधी मिळायला हवी. एक प्रश्न सत्ताधारी आमदाराने विचारल्यानंतर दुसरा प्रश्न विरोधी आमदाराला विचारण्याची संधी मिळायला हवी. विधिमंडळ खात्याने मिश्र प्रश्न घेण्याचे ठरवल्याने विरोधकांना डावलले जाण्याची शक्यता आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. वाढती बेरोजगारी, म्हादई, आपत्कालीन यंत्रणांना आलेले अपयश आदी विषयांवरून सर्व विरोधी आमदार सरकारला संयुक्तपणे घेरणार असल्याचे युरी यांनी सांगितले.
आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, सभागृहात भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. सभापती व मंत्री वगळले तरी २० सत्ताधारी आमदार राहतात. विरोधक फक्त ७ जण आहेत. मिश्र प्रश्न घेतल्यास सत्ताधारी आमदारांना जास्त संधी मिळेल व विरोधकांवर अन्याय होईल. हे आम्ही होऊ देणार नाही.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून ६ दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज असणार आहे. अल्प कालावधीचे अधिवेशन ठेवल्याने त्याबद्दलही युरी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सरकारला आमच्या हक्कांना कात्री लावायची आहे. पुढील सहा महिने अधिवेशन होणार नाही.
'इंडिया' अलायन्सी जी जागा देईल ती घेऊ: वेंझी व्हिएगश
लोकसभेत आम आदमी पक्ष गोव्यात उमेदवार देणार का? या प्रश्नावर पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, दक्षिण आणि उत्तर गोवा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत. 'इंडिया' अलायन्सी जी जागा आपला देईल ती घे व तेथे आमचा उमेदवार उभा करू.
विरोधकांनी मला भेटून म्हणणे मांडावे : सभापती
सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले की, अशी पद्धत पूर्वीही होती. मध्यंतरीच काही काळ सत्ताधारी व विरोधकांचा एकेक प्रश्न घेण्यात येऊ लागला. आता मी ती बदलून पूर्वीप्रमाणे केली आहे एवढेच. विरोधी आमदारांची काही तक्रार असेल किंवा आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी मिळणार नाही, अशी भीती वाटत असेल तर त्यांनी मला येऊन भेटावे. मी त्यांचे म्हणणे ऐकून घेईन.
लोकसभा निवडणूक लढणार नाही : विजय सरदेसाई
गोवा फॉरवर्ड लोकसभा निवडणूक लढवणार नाही. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी पाठिंब्याबाबत माझ्याशी संपर्क साधलेला नाही, असे आमदार विजय सरदेसाई यांनी एका प्रश्नावर सांगितले. ते म्हणाले की, अजून कोणीही संपर्क साधलेला नसल्याने राष्ट्रीय स्तरावरील 'इंडिया' आघाडीत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत निर्णय अजून घेतलेला नाही.'
आता अर्बन नक्षलींवर कारवाई कराच: विरोधक
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्बन नक्षलवाद्यांसंबंधी केलेल्या विधानाचा सातही विरोधी आमदारांनी यावेळी समाचार घेतला. अर्बन नक्षलवाद्यांमुळे राज्यातील सामाजिक सलोख्याला धोका आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची नावे जाहीर करून कारवाई करावी, अशी मागणी सर्वांनी केली.