गोवन काजूचे ब्रँडिंग करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन, आंतरराष्ट्रीय काजू परिषदेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 12:43 PM2024-06-15T12:43:52+5:302024-06-15T12:45:38+5:30
आफ्रिकन काजूचा शिरकाव थांबवा.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील काही कारखानदार आफ्रिकन देशात कमी दरात मिळत असलेला काजू आणून तो गोवन काजू म्हणून विकतात. त्यामुळे गोमंतकीय शेतकऱ्यांच्या अस्सल काजूला चांगला दर मिळत नाही. त्यासाठी आता गोमंतकीय काजूचे खास ब्रडिंग होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
काजू आणि कोको विकास संचालनालय, कोची (केरळ) व कृषी संचालनालय (गोवा), गोवा फलोत्पादन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन, दोनापावला येथे आयोजित काजूवर आधारित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते या परिषदेत उद्घाटन करण्यात आले. रविवारीही काजू विषयावर चर्चा सत्र होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, गोव्याचा काजू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. राज्यात काजू उत्पादन वाढावे, यासाठी आम्ही विविध योजना राबवत आहोत. तसेच शेतकऱ्यांसाठी खास आधारभूत किंमतही दिली जाते. पण आता राज्यात आफ्रिकन काजू आणून तो गोवन काजू म्हणून विकला जात आहे. त्यासाठी आता खास गोमंतकीय काजूचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, काजूपासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला जीआय टॅग मिळाला आहे. तसेच आता हुर्राक आणि काजूगरालाही जीआय टॅग मिळणार आहे. यामुळे गोव्याची काजू फेणी जगभर प्रसिद्ध झाली आहे. आता काजूगर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
३०० प्रतिनिधींनी घेतला सहभाग
'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे, काजू उत्पादन वाढ आणि त्यासमोरील आव्हाने हा परिषदेचा प्रमुख विषय आहे. या परिषदेत देशभरातून सुमारे २५० ते ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. काजू विषयावर विविध चर्चासत्रांचा कार्यक्रम त्यांनी घेतला. त्यासाठी काजू क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले असून, त्यांची व्याख्याने व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे.
शेतकऱ्यांनी परिषदेला यावे
गोवा राज्यात काजू हे प्रमुख पीक असून, अनेक शेतकरी त्या पिकावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात तर अनेक कुटुंबे काजूवर अवलंबून आहेत. गोव्यातील काजू शेतकऱ्यांनी या परिषदेस हजेरी लावावी, असे आवाहन कृषी खाते संचालक संदीप फळदेसाई यांनी केले आहे. 'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे.