विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2016 02:07 AM2016-05-29T02:07:28+5:302016-05-29T02:08:03+5:30
म्हापसा : इयत्ता दहावीचा निकाल विक्रमी लागला. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांच्या आधारावर इच्छुक असलेल्या शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी
म्हापसा : इयत्ता दहावीचा निकाल विक्रमी लागला. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांच्या आधारावर इच्छुक असलेल्या शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी चांगलीच चढाओढ सुरू झाली आहे.
महाविद्यालयासमोर प्रवेशासाठी पहाटेपासून रांगा लागू लागल्या आहेत. महाविद्यालयाचा दर्जा, कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावा या चिंतेत पालक व त्यांची मुले असताना महाविद्यालयात उपलब्ध जागांपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने चिंता निर्माण झाली आहे. काठावर प्रवेश मिळण्याची शक्यता असेलेल्या काही पालकांनी वशीला लावून प्रवेश मिळविण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत.
काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे प्रवेश मिळविणे सुलभ झाले आहे तर टक्केवारी कमी असलेल्या एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविण्यासाठी कुठल्या महाविद्यालयात जावे, हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी झुंबड पडली असल्याचे चित्र दिसून आले आहे.
गोवा शालान्त मंडळातर्फे १ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान २६ केंद्रांवरून इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. बार्देस तालुक्यात पर्वरी, म्हापसा, शिवोली, कळंगुट या केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. तालुक्यात परीक्षेत एकूण ५६ हायस्कूलमधील ३२७६ विद्यार्थी बसले होते. त्यातील ३०४० विद्यार्थी उतीर्ण झाले. गत वर्षीपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा या वर्षी ३२४ वाढला आहे.
इयत्ता दहावीनंतर बार्देस तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षण देणाऱ्या १० शैक्षणिक संस्था आहेत. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयात एकूण २८२५ जागा उपलब्ध आहेत. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३०४० आहे.
उपलब्ध जागेपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा २१५ नी जास्त आहे. शहरातील कॉलेजात बार्देस तालुक्यातील विद्यार्थी सोडून पेडणे तसेच डिचोली व सत्तरी तालुक्यांतीलही विद्यार्थी प्रवेश मिळविण्यासाठी येतात. त्यामुळे उपलब्ध जागा कमी व विद्यार्थी जास्त असे चित्र तालुक्यात झाले आहे.
म्हापसा शहराजवळ असलेल्या काही गावांत महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध असून सुद्धा तसेच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध असून सुद्धा पालकांनी शहरात येऊन प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचा फायदा गावातच राहून महाविद्यालयीन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांना झाला आहे. त्यांना तेथे सहजतेने प्रवेश मिळाला आहे. पर्वरी, सुकूर, बेती या भागातील विद्यार्थी पणजीतल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश मिळवितात. त्यांना तेथे जाणे सुलभ होत असल्याने बार्देस तालुक्यातील कॉलेजांवरील ताण बराचसा कमी झालेला आहे.