ब्रिटीश महिलेवर बलात्कार केलेल्या आरोपीचे शौचालयातून पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 04:42 PM2019-06-28T16:42:33+5:302019-06-28T16:43:42+5:30
मडगावच्या न्यायालयातील घटना : बलात्कारासह पर्यटकांना लुटण्यातही होता सामील
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : पाळोळे- काणकोण येथे सहा महिन्यापूर्वी एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला यल्लप्पा रामचंद्रनप्पा या आरोपीला शुक्रवारी मडगाव न्यायालयात सुनावणीस आणले असता शौचालयात जाण्याच्या बहाण्याने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. बलात्कार प्रकरणातील पलायन करणारा हा दुसरा आरोपी असून यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये बेतालभाटी सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी ईश्वर मकवाना याने इस्पितळात उपचार चालू असताना पळ काढला होता. या घटनेला सहा महिने उलटूनही आरोपीचा छडा लावण्यास पोलिसांना अपयश आले आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शुक्रवारी सकाळी त्याला पणजी एस्कॉर्ट पोलिसांनी कोलवाळ तुरुंगातून मडगाव न्यायालयात आणले होते. न्यायालयात पोहचल्यानंतर आरोपीने आपल्याला शौचालयात जायला पाहिजे, असे सांगून तळमजल्यावरील शौचालयात तो गेला. नंतर त्याने शौचालयाच्या खिडकीला लावलेल्या काचा काढून मागच्या बाजूने पळ काढला. शौचालयात गेलेला आरोपी बराच वेळ होऊनही बाहेर आला नसल्याने संशय आलेल्या पोलीसांनी आत जाऊन बघितले असता आरोपी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी मडगाव पोलीसात तक्रार दिल्यानंतर लगेच शोधाशोध सुरु झाली. पोलीसानी मडगाव रेल्वेस्थानक परिसर आणि इतर ठिकाणे पिंजून काढूनही आरोपी हाती लागू शकला नाही. संपूर्ण गोव्यातील पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचे गावस यांनी सांगितले.
मागच्या डिसेंबर महिन्यात काणकोण तालुक्यातील पाळोळे समुद्र किना:यावर उतरलेल्या एका 37 वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार करुन तिचे सामान लुटल्याच्या आरोपाखाली रामचंद्रनप्पा याला मडगाव रेल्वे स्थानकावर अटक केली होती. त्यानंतर सदर आरोपीचा त्यापूर्वी उत्तर गोव्यातील मांद्रे येथे एका पर्यटक दांपत्याचे लाखो रुपयांचे दागिने लुटण्याच्या घटनेतही हात असल्याचे उघड झाले होते. मूळ तंजावर - तामीळनाडू येथील हा आरोपी चोरी करण्याच्या उददेशानेच गोव्यात आल्याचे उघड झाले होते.
ईश्वर मकवाना अजुनही फरार
काणकोणातील ही बलात्काराची घटना घडण्याच्या दहा दिवसांपूर्वी बेतालभाटी सामुहिक बलात्कार प्रकरणात मूळ मध्यप्रदेश येथील ईश्वर मकवाना हा प्रमुख आरोपी पणजीतील इस्पितळातून सुरक्षा रक्षकाना गुंगारा देऊन पळून गेला होता. आपल्या पोटात दुखत असल्याचा बहाणा करुन त्याने आरडाओरडा सुरु केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला काय झाले ते बघण्यासाठी वॉर्डचा दरवाजा उघडला असता त्या सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन आरोपीने पळ काढला होता. मूळ भिल्ल जातीच्या या आरोपीवर मध्यप्रदेशातही कित्येक बलात्कार व खुनाचे गुन्हे दाखल झाले होते. मध्यप्रदेश पोलीसांसाठीही तो मोस्ट वॉंटेड होता. मागचे सहा महिने गोवा पोलीस त्याचा शोध घेत असून अजुन तो सापडलेला नाही. त्याच्या विरोधात मडगाव न्यायालयाने फरारनामाही जारी केला आहे.
...अन् दुसराच चोरटा सापडला
न्यायालयाच्या शौचालयातून पळून गेलेल्या रामचंद्रनप्पाचा शोध घेण्यासाठी मडगावचे एलआयबी पोलीस मडगाव रेल्वेस्थानक परिसर पिंजून काढत असताना योगायोगाने त्यांच्या हाती नूर महम्मद हा भलताच चोरटा हाती लागला. मागच्या रविवारी लोटली येथील अवर लेडी ऑफ मिलाग्रीस सायबिणीचे कपेल फोडून त्यातील देवाच्या मूर्ती चोरुन नेल्या होत्या. या चोरीत नूर महम्मदचा हात होता अशी माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.