मृत्यूनंतरही विष्णू सूर्या वाघ यांच्याविषयी वाद, मृत्यूच्या चौकशीची भावाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:43 PM2019-02-14T12:43:57+5:302019-02-14T12:51:32+5:30
अवलिया कलावंत विष्णू सूर्या वाघ यांच्या जीवनात सतत काही ना काही वाद झालेले आहेत. ते गंभीर आजारी असतानाही, अंथरूणाला खिळलेले असतानाही त्यांच्या सुदिरसुक्त या काव्यसंग्रहावरून गोव्यात मोठा वाद झाला होता.
सुरेश गुदले
पणजी - अवलिया कलावंत विष्णू सूर्या वाघ यांच्या जीवनात सतत काही ना काही वाद झालेले आहेत. ते गंभीर आजारी असतानाही, अंथरूणाला खिळलेले असतानाही त्यांच्या सुदिरसुक्त या काव्यसंग्रहावरून गोव्यात मोठा वाद झाला होता. आता त्यांच्या निधनानंतरही वाद काही त्यांची पाठ सोडत नाही. त्यांचे बंधू आणि गोवा विद्यापीठातील प्रा. रामराव वाघ यांनी भावाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केलेली आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. एवढे दिवस मरण गुप्त का ठेवले गेले, याची चौकशी व्हावी. विष्णूला केपटाउनमध्ये का नेले. तिथे काय उपचार केले, याविषयी कागदपत्रे जाहीर करावीत, असे रामराव यांचे म्हणणे आहे.
एकूण काय वाघ आणि वाद हे समीकरण कायम राहिलेले आहे. वाघांनी निवडलेले अनेक विषयही वादाची किनार असलेले. समकालीन सामाजिक आणि राजकीय घटनांचे संदर्भ घेतलेले लिखाण त्यांनी केले. त्यात ‘साम्राज्य’सारख्या नाटकाचा समावेश आहे. मगो पक्षाशी एका रात्रीत फारकत घेऊन कॉँग्रेसमध्ये जात मुख्यमंत्री बनलेले रवी नाईक यांच्या राजकीय जीवनाचा आलेख या नाटकात असल्याची खमंग चर्चासोबत घेऊनच नाटकाचे प्रयोग झाले.
फोंडा (गोवा) येथे प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या एका अधिकाऱ्याने आपली कल्पकता कामाला लावत एक विहीर खणल्याचे कागदोपत्री दाखवले आणि पैसे उकळले. हा संदर्भ पकडून विष्णू यांनी लिहिलेले ‘पेद्रू पडलो बांयत’ (अधिकारी पडला विहिरीत) हे तियात्रही खूपच गाजले. अलीकडेच वादाच्या वावटळीत सापडलेले त्यांचे पुस्तक म्हणजे सुदिरसूूक्त हा काव्यसंग्रह. तो कोंकणीत आहे. गोव्यातील भाषावादात वाघांनी मराठीची बाजू सातत्याने लावून धरली. साहजिकच बराच काळ कोंकणी समर्थकांसाठी ते अस्पृश्य राहिले. त्यांचे सुदिरसूक्त एक तर कुणी चोखंदळाने वाचले नाही किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. पण कोंकणी अकादमीने आपल्या पुरस्कारासाठी तो काव्यसंग्रह विचारात घेतल्याचे वृत्त आल्यावर गदारोळ उठला होता. आता मत्यूनंतरही वादामुळे आणखी काही दिवस ते बातमीत राहतील एवढे नक्की.
तुका अभंग अभंग
विष्णू सूर्या वाघ यांचे तुका अभंग अभंग नाटक खूप गाजले. आजही गोव्यासह महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धात या नाटकाचे प्रयोग होतात. ब्राह्णण्यवादी शक्तींनी संत तुकारामांचा खून केला आणि ते सदेह वैकुंठाला गेल्याचे कुंभाड रचले गेले असे या नाटकात म्हटले होते.
बंधू रामराव म्हणतात...आम्हाला काही माहितीच नाही
विष्णू वाघ या माझ्या भावाच्या जाण्याने मला अतिव दु:ख झालेले आहे. अंत्यसंस्कार कोठे आणि कधी केले जाणार आहेत, याविषयी तुम्ही माझ्याकडे याक्षणी काही विचारणा करू नका. ही माहिती योग्यवेळी समजेल, अशी अपेक्षा करूया. यावेळी माझ्या कुटुंबीयांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. माझ्या भावाच्या मृत्यूविषयी तुम्हाला जी माहिती आहे, तेवढीच मलाही आहे. माझ्या भावाला दक्षिण आफ्रिकेत नेल्याची माहिती मला नव्हती आणि कोणीही सांगितलेही नाही. तेथे काय झाले याचीही काही कल्पना नाही. योग्यवेळी गोष्टी समजतील.