Budget 2021: गोव्याला तीनशे कोटींचा निधी जाहीर झाल्याने सरकारला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 03:27 PM2021-02-01T15:27:32+5:302021-02-01T15:28:25+5:30
गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करतानाच राज्यातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचे व किल्ल्यांचे नूतनीकरण केले जाईल असे नुकतेच सरकारने घोषित केले होते.
पणजी : गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करण्यासाठी केंद्र सरकारने गोव्याला तीनशे कोटींचा निधी अर्थसंकल्पातून सोमवारी जाहीर केल्याने गोवा सरकार सुखावले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लगेच केंद्राचे आभार मानले. गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून डिसेंबर १९६१ साली स्वतंत्र झाला. मुक्तीची साठ वर्षे साजरी करण्यास सरकारने आरंभ केला आहे. गेल्या १९ डिसेंबर रोजी प्रथमच राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना निमंत्रित करून सरकारने गोवा मुक्ती सोहळाही साजरा केला.
मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्राकडे दोन महिन्यांपूर्वी निधी मागितला होता. गोवा मुक्तीचे कार्यक्रम देशभर वर्षभर साजरे केले जातील व त्यावर शंभर कोटी रूपये गोवा खर्च करील अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली होती. गोव्यात सर्वत्र ही घोषणा चर्चेची ठरली. कोविड काळात राज्य आर्थिक अडचणीत असताना गोवा मुक्तीवर शंभर कोटी रुपये का खर्च करायला हवेत असे प्रश्न विरोधी आमदारांनी विचारले होते. मात्र सरकारने समिती नेमून वर्षभरातील कार्यक्रमांची रुपरेषाही ठरविण्यास आरंभ केला. देशातील प्रमुख शहरांमध्ये कार्यक्रम होतील व गोव्याची संस्कृती, इतिहास व पर्यटन याचा प्रचार या कार्यक्रमातून केला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करतानाच राज्यातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचे व किल्ल्यांचे नूतनीकरण केले जाईल असे नुकतेच सरकारने घोषित केले होते. या कामासाठीही सरकारला केंद्राकडून निधी हवा होता. दरम्यान तीनशे कोटींच्या तरतुदी बाबत मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार मानले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही सातत्यपूर्ण सहकार्य व मार्गदर्शनाबाबत आपण आभार मानतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
तानावडेंकडून स्वागत
दरम्यान, अर्थमंत्र्यांनी गोव्याला 300 कोटी रुपये घोषित केल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही घोषणेचे स्वागत केले. तानावडे म्हणाले, अर्थमंत्र्यांनी कोविड 19 साठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करून सर्व सामान्यांना दिलासा दिला आहे. या अर्थसंकल्पात सामन्यातील सामान्य माणसाला दिलासा देण्याचा विचार केला आहे. तसेच 75 वय पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावयामध्ये सूट दिल्याने पेन्शन धारकांना याचा मोठा लाभ होईल.
अर्थमंत्र्यांनी छोटे उद्योग, किरकोळ व्यापारी आणि स्टार्ट अप सुरू करणाऱ्यांसाठी मोठी तरतूद केली असल्याचे श्री तानावडे म्हणाले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत निर्माण होईल. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही अर्थमंत्र्यांनी मोठी तरतूद करून बळीराजाला दिलासा दिला आहे. आजचा अर्थसंकल्प आरोग्य सेवा - सुविधा निर्मिती, भांडवल उभारणी, पायाभूत सुविधांची उभारणी, संशोधन आणि विकास तसेच लोकाभिमुख प्रशासन या 6 सुत्रीवर तयार केल्याचे तानावडे म्हणाले