पैसेवाल्यांची दादागिरी, पोलिसांचीही कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:15 AM2023-08-10T11:15:45+5:302023-08-10T11:16:40+5:30

जनतेत संताप व्यक्त होत आहे. 

bully of the rich the test of the police | पैसेवाल्यांची दादागिरी, पोलिसांचीही कसोटी

पैसेवाल्यांची दादागिरी, पोलिसांचीही कसोटी

googlenewsNext

बाणस्तारी येथील अपघात पूर्ण गोमंतकीय समाजाला सुन्न करणारा ठरला आहे. चार दिवस उलटले, तरी राज्यभर केवळ त्याचीच चर्चा सुरू आहे. तिघा निष्पाप व्यक्तींचा जीव घेणारा वाहन चालक कुणीही असो; पण तो सुटू नये ही सगळ्यांचीच भावना आहे. चालक परेश सावर्डेकरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असला तरी लोकांचा पोलिसांवर विश्वास नाही. त्यामुळेच लोक गेले दोन दिवस म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धाव घेत आहेत. गर्दी करत आहेत. जनतेत संताप व्यक्त होत आहे. 

फडते दाम्पत्यासह तिघांना वाहन चालकाने संपविले. त्याशिवाय काही जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींची आणि त्यांच्या कुटुंबाची वेदना शब्दात व्यक्त करता येणार नाही. अपघात पाहिलेले साक्षीदार सांगतात की, पत्नी मेघना वाहन चालवत होती. दिग्विजय वेलिंगकर या साक्षीदाराने तशी तक्रारही पोलिसांत दिली आहे. मात्र, पोलिसांचे म्हणणे असे की परेश सावर्डेकरच अपघातग्रस्त मर्सिडीज चालवत होते. गाडीची नोंदणी मेघनाच्या नावावर आहे. अपघात झाला तेव्हा दोघांनीही दारू ढोसली होती, मग पत्नीची चाचणी का केली नाही, असा प्रश्न लोक विचारत आहेत. पोलिस मेघनाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ग्रामस्थांना वाटते. सत्य काय हे पोलिस शोधून काढतील असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. 

हायप्रोफाइल मंडळी अपघातात गुंतलेली आहेत. सरकार असो किंवा पोलिस, अनेकदा संशयित आरोपींचे समाजातील स्थान, ऐश्वर्य, पद यांचा विचार करतात. लोकांचा पोलिसांवरचा विश्वास फार पूर्वीच उडाला आहे. तरीदेखील मुख्यमंत्री सावंत यांना वाटते की, तपासकार्य योग्य प्रकारे सुरू आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन मुख्यमंत्री करतात. म्हणजे लोकांनी पोलिसांवर, राजकारण्यांवर विश्वास ठेवावा, असा अर्थ झाला. वास्तविक वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पूर्वीच म्हटलेय की, पोलिसांनी कोणताही बेबनाव करू नये. बास्तातील अपघात हा तिघांचा केलेला खूनच आहे. 

सरकारमधील एक मंत्री असे बोलतो. भाजपचेच एक आमदार राजेश फळदेसाई लोकांसमवेत म्हार्दोळ पोलिस स्थानकावर जाऊन मेघना सावर्डेकरला अटक व्हावी, या जनभावनेशी सहमती दर्शवतात. पोलिसांनी ज्याला पकडलेय तो खरोखर परेश सावर्डेकरच आहे ना, याची खात्रीदेखील फळदेसाई स्वत: कोठडीपाशी जाऊन करून घेतात. आपल्याच सरकारच्या हाती असलेल्या पोलिस यंत्रणेवर आमदारांचाही शंभर टक्के विश्वास नाही, असे यातून समजावे काय, असा प्रश्न मनात येतोच. वास्तविक सरकारने हे अपघात प्रकरण सीआयडी विभागाकडे ( क्राइम बँच) सोपवायला हवे. एरव्ही साधी प्रकरणे काढून गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिली जातात. सध्या सगळीकडे जनतेचा आक्रोश असताना हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवावे, असे सरकारला का वाटत नाही? गरीब माणसांच्या मुसक्या आवळायच्या असतात तेव्हा सरकार उत्साह दाखवते.

मात्र, सध्या सरकारच्याही हातापायांना मुंग्या आलेल्या असतील, असा संशय येतो. बाणस्तारीत अपघात झाल्यानंतर लगेच पोलिसांनी चालकाला अटक केली नाही. पोलिस म्हणतात त्याप्रमाणे खरोखर मेघना वाहन चालवत नव्हती, असेदेखील समजता येते. कदाचित साक्षीदाराचा गैरसमज झाला असावा. अपघात झाल्यानंतर ती स्टेअरिंगच्या ठिकाणी बसून अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला काढत होती, असेदेखील मानता येते. 

मात्र, क्राइम बँचकडे किंवा प्रामाणिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडे हे प्रकरण तपासासाठी दिले गेले तरच लोकांचा विश्वास बसेल. या अपघात प्रकरणात गुंतलेल्या व्यक्ती साध्या सुध्या नाहीत. प्रचंड पैसा असलेली माणसे आहेत. राजकीय व उद्योग वर्तुळात दबदबा आहे. तथाकथित उच्चभ्रू समाजाला कोणतेच सरकार कधी दुखवू पाहत नाही. सध्या पोलिसांची व सरकारचीही कसोटीच आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला तर संबंधित आरोपीला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होते. तशी कायद्यात तरतूद आहे. मात्र, तपासकामात कच्चे दुवे ठेवण्याची पोलिसांना सवय असते. त्यामुळे जागते रहो, एवढाच संदेश सध्या लोकांना द्यावा लागेल.
 

Web Title: bully of the rich the test of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.