गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश
By किशोर कुबल | Published: December 15, 2022 06:06 PM2022-12-15T18:06:44+5:302022-12-15T18:08:04+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
पणजी : क्रुझ लायनर जहाजातून गोव्याच्या मुरगांव बंदरात उतरलेल्या सुमारे ८0 अमेरिकन पर्यटकांना गोवा दर्शनासाठी बसेसमध्ये प्रवेश करण्यास टुरिस्ट टॅक्सीचालकांनी मज्जाव केल्याचे प्रकरण राज्य सरकारने गंभीरपणे घेतले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारची दादागीरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अमेरिकन पर्यटकांची सरकारच्यावतीने माफी मागितली असून लवकरच मुरगांव बंदरात पर्यटकांसाठी काउंटर उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुरगांव बंदरात उतरलेल्या पर्यटकांनी टुरिस्ट टक्सींमधून गोवा दर्शन करावे, ट्रॅव्हल एजन्सीच्या बसमधून (कोच) नव्हे, असा पवित्रा घेत टॅक्सीचालकांनी या पर्यटकांना अडविले. मुख्यमंत्र्यांना ही माहिती मिळताच त्यांनी त्वरित पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आणि ज्या कोणी हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश दिले.
टूर आॅपरेटरच्या बस चालकावर एका टॅक्सीचालकांना थप्पड मारली. पर्यटकांना बसमधून नेल्यास दगडफेक करु, अशी धमकी टॅक्सीवाल्यांनी दिल्याचाही आरोप केला जात आहे. या एकूण प्रकारामुळे पर्यटक भांबावले व गोवा दर्शनाच बेत रद्द करुन क्रुझ लायनरमध्ये परतले.
या प्रकरणी टूर आॅपरेटरने पोलिसात तक्रार दिली आहे. असा प्रकार जर घडला असेल तर संबंधिताला अटक केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टूर आॅपरेटर्सनी मुख्यमंत्र्यांना भेटले -
या प्रश्नावर काही टूर आॅपरेटर्सनी नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व अशाने गोव्याचे नाव जगभर बदनाम होईल, याकडे लक्ष वेधले. अमेरिक न पर्यटकांनी गोवा दर्शनासाठी आधीच बसेस आरक्षित केल्या होत्या.
पर्यटनमंत्र्यांकडून माफी : बंदरात पूर्ववत् जीटीडीसीचा काउंटर येणार -
दरम्यान, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकाराबद्दल सरकारच्यावतीने पर्यटकांची माफी मागितली असून लवकरच मुरगांव बंदरात पर्यटन विकास महामंडळाचा काउंटर पूर्ववत सुरु केला जाईल, असे सांगितले. खंवटे म्हणाले की, अशा प्रकारांमुळे गोव्याची बदनामी होईल. जहाजाच्या कप्तानाने पुन्हा आपण गोव्यात येणार नाही, असे जाहीर केले आहे. अमेरिकन पर्यटक जादा खर्च करणारे असतात. अशा हाय एंड पर्यटकांची गोव्याला गरज आहे.’