पोलिसांची दादागिरीच; गैर पद्धतीने वागत असतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 10:15 AM2024-01-30T10:15:07+5:302024-01-30T10:15:50+5:30
राज्यातील पोलिस दलात पूर्वीसारखी भीती राहिलेली नाही
राज्यातील पोलिस दलात पूर्वीसारखी भीती राहिलेली नाही, माशेल भागात एका फास्ट फूड व्यावसायिकाला पोलिसांच्या एका गटाने बेदम मारहाण केली. व्हिडीओ पाहून अनेक गोमंतकीयांच्या मनात प्रचंड संताप दाटून आला. साध्या कारणावरून सामान्य व्यक्तीला अशी मारहाण करणारे मुळात पोलिस कसे असू शकतात, असा प्रश्न पडतो. गोव्यात अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडत असतात. सामान्य माणूस काहीवेळा तक्रार करायला जात नाही.
माशेल येथील प्रकार तर फारच गंभीर आहे. चेहऱ्यावर आणि शरीरावर जोरदार ठोसे मारून त्या फास्ट फूड व्यावसायिकाला जखमी केले गेले, अमानुष पद्धतीची ही मारहाण आहे. विराज माशेलकर असे फास्ट फूड मालकाचे नाव आहे. पोलिस खात्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन लगेच कारवाई सुरू केली, ही चांगली गोष्ट आहे. या प्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला सेवेतून निलंबित करण्यात आले, तर दुसऱ्या एका पोलिसाला अटक झाली आहे. आपल्यालाही अटक होऊ शकते याची कल्पना आल्याने आणखी एकटा फरारच झाला आहे. यांना पोलिस म्हणायचे काय असा प्रश्न पडतोच.
राज्यात काही पोलिस खूप गैर पद्धतीनेच वागत असतात, काहीजण तर दादागिरीही करत असतात. लाचखोरीची तक्रार तर काही पोलिसांबाबत अनेकदा येत असते. किनारी भागात आपल्याला ठरावीक ठिकाणीच पोस्टिंग मिळायला हवी म्हणून अनेक पोलिस धडपडत असतात. अनेकदा काही वाहतूक पोलिस पर्यटकांना बरेच छळतात. वारंवार पर्यटकांच्या गाड्या थांबविल्या जातात किंवा परराज्यांतून येणारे ट्रक थांबवून वारंवार कागदपत्रे दाखविण्यास सांगितले जाते, फक्त गोवा राज्यातच हे घडते; मात्र याबाबत पोलिस खात्याच्या प्रमुखांनीही कधी कडक भूमिका घेतली नाही व गृह खात्यालाही कधी हे गंभीरपणे घ्यावे असे वाटले नाही.
चक्क पर्यटनमंत्री रोहन खंवटे तसेच भाजपचेच आमदार मायकल लोबो यांनी देखील अशा प्रकारांबाबत पूर्वी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. गोव्याच्या पर्यटनावर अशा काही वाहतूक पोलिसांमुळे परिणाम होत आहे. काही पोलिस आपल्याला लुटतात, अशी नापसंतीची भावना मनात घेऊन पर्यटक माघारी परतत असतात; मात्र पोलिस दल याबाबत सुधारणा करत नाही, पोलिसांनी कसेही वागले तरी चालते असे काही जणांना वाटते की काय?
आम्हाला आज आठवतंय की (स्व.) मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना अनेक पोलिस सेवेतून निलंबित केले जात होते. पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्यांनी गैरप्रकार करू नयेत, लाचखोरी करू नये म्हणून पर्रीकर दक्ष असायचे. मुख्यमंत्र्यांचा धाक असावाच लागतो. गेल्यावर्षी कळंगुटच्या पट्ट्यात खंडणी प्रकरण गाजले होते. अगदी कळंगुटच्या आमदारालादेखील अंधारात ठेवून काहीजण खंडणीराज सुरू करू पाहत होते, काही रेस्टॉरंट मालकांनीच तेव्हा तक्रार केली होती, हप्तेबाजीचा कळस गाठायचा असा काही जणांचा हेतू होता.
आमदार लोबो यांनीच त्या प्रकरणाचे बिंग फोडले, मग तो प्रकार थांबला, किनारी भागात मध्यरात्रीनंतरही मोठ्या पार्यो चालतात, कर्णकर्कश संगीताचा वापर होतो. म्युझिक रात्री दहा वाजता बंद होतच नाही. काही पोलिस व काही राजकारण्यांच्या आशीर्वादाने हे चालते. काही पोलिस कॉन्स्टेबलनादेखील वाट्टेल तसे वागण्याची मुभा मिळाली आहे. पोलिस खात्यात भरती करतानादेखील उमेदवारांची नीट छाननी होत नाही, वशिल्याने काहीजण सेवेत घुसतात. काहीजण पैसे चारूनच नोकरी मिळवतात. गुंड प्रवृत्ती अशा मार्गाने पोलिस दलात प्रवेश करते. त्यांना मग ठरावीक काळाने बढत्याही मिळतात. काहींचे राजकीय नेत्यांकडून सत्कार होतात. सगळी व्यवस्था मग सडू लागते, लोकांना पोलिसांकडून न्याय मिळत नाही.
साधा एफआयआर देखील काही पोलिस स्थानके नोंदच करत नाहीत. पोलिसांत जाणे म्हणजे कंटाळा असे अन्याय झालेल्या व्यक्तीला वाटू लागते. ही स्थिती बदलावी लागेल, मध्यंतरी दक्षिण गोव्यातील एक पोलिस चक्क चोरट्यालाच सामील झाला होता. त्याने उत्तर गोव्यात जाऊन चोऱ्या कर असा सल्ला चोरट्याला दिला होता. त्याला मग नोकरीवरून कायमचे काढून टाकण्यात आले. सारी व्यवस्थाच सड लागली आहे. हे बदलावे लागेल.