गोवा विद्यापीठात विद्यार्थ्यांची दादागिरी; शिक्षकाला धमकविण्याचा प्रकार
By समीर नाईक | Published: September 11, 2023 05:25 PM2023-09-11T17:25:48+5:302023-09-11T17:26:29+5:30
दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
समीर नाईक, पणजी: गोवा विद्यापीठात निवडणुकीच्या नावाखाली एका विद्यार्थ्याची वारंवार दादागिरी सुरू आहे, यापूर्वी फक्त विरोधी विद्यार्थ्यांना धमकविण्यात येत होते, परंतु आता शिक्षकांना देखील धमकाविण्यात येत आहे, यातून शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, दादागिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली.
गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेतर्फे सोमवारी विद्यापीठाच्या परीसरात जमून या घटनेचा निषेध केला. प्रा. रामराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी एकत्रित येऊन, त्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
विद्यापीठाच्या निवडणुका ऑगस्ट मध्ये होणार होत्या, यादरम्यान शिशिर परब या विद्यार्थ्याने विद्यार्थी कल्याण संचालक प्रा. अँथनी विएगस यांना त्यांच्या केबिन बाहेर थांबून हातात काठी घेऊन धमकावले होते, तसेच त्यांची गाडी शिशिर आणि त्यांच्या दोन साथीदाराने अडविली होती. त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. नंतर ही निवडणुका रद्द करून पुढे ढकलण्यात आली होती. याबाबत आम्हाला कळताच आम्ही कुलगुरू व रजिस्ट्रार यांना कळवीत पोलिस तक्रार करण्याची मागणी केली होती, पोलिस तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यांवर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही, अशी माहिती प्रा. रामराव वाघ यांनी यावेळी दिली.
निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर, ९ सप्टेंबर रोजी पुन्हा छाननी झाली, यावेळी देखील शिशिर परब याने प्रा. अँथनी विएगस यांना थेट केबिनमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांचा खुर्चीच्या बाजूला थुकण्याचा प्रकार केला. त्यांना धमकविण्यात आले. पोलिस यावेळी उपस्थीत होते, परंतु त्यांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही. यावरून सिद्ध होते की त्या विद्यार्थ्यांना राजकीय पाठिंबा मिळत आहे. तसेच वारंवार विएगस यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे. हे आम्ही आता सहन करणार नाही, त्यामुळे त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही प्रा. वाघ यांनी पुढे सांगितले.
एनएसयुआयने देखील या कृत्याचा निषेध केला (चौकट करणे)
गोवा विद्यापीठाच्या निवडणुकी दरम्यान विद्यार्थि कल्याण संचालकांवर दबाव आणण्याचे काम भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे. संचालकांना धमकवणारा विद्यार्थि हा अभाविपशी निगडित आहे. त्यांच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो, तसेच अभाविपला निवडणुकांपासून दूर ठेवण्याची मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती एनएसयुआय गोवा प्रमुख नौशाद चौधरी यांनी दिली.