सासष्टीच्या किनाऱ्यावर रापणीत मोठ्या प्रमाणावर मासळी, मच्छिमार खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:39 PM2020-09-01T16:39:04+5:302020-09-01T16:39:19+5:30
सोमवारी सायंकाळी बेतालभाटी येथे घातलेल्या रापणीत मोठ्या प्रमाणात पापलेट आणि अन्य प्रकारची मासळी सापडली अशी माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली.
मडगाव : परप्रांतीय कामगार अजूनही आवश्यक त्या प्रमाणात न आल्याने अजूनही ट्रोलर वापरून मासे पकडणे पूर्ण जोमात सुरू झाले नसले तरी पारंपरिक रापणीत या दिवसात मोठ्या प्रमाणात मासळी मिळत असल्याने मच्छिमार खुश आहेत.
सोमवारी सायंकाळी बेतालभाटी येथे घातलेल्या रापणीत मोठ्या प्रमाणात पापलेट आणि अन्य प्रकारची मासळी सापडली अशी माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली. या रापणीत सुमारे 60 ते 70 मच्छिमारांनी भाग घेतला होता.
परप्रांतीय मजूर जरी अजून आले नसले तरी ही रापणीची मासेमारी स्थानिकांकडूनच केली जाते अशी माहिती कोलवा येथील पारंपरिक मच्छिमार पेले फेर्नांडिस यांनी दिली.
फेर्नांडिस म्हणाले, सध्या कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने गावातील कित्येक युवक बेकार आहेत. हे युवक आता या पारंपरिक मच्छिमारी करण्यासाठी येत आहेत.
दरम्यान, काही यांत्रिक ट्रोलर्स किनाऱ्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर मासेमारी करत असल्यामुळे रापणीवर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार करत आहेत या यांत्रिकी बोटींनी किनाऱ्यापासून 5 किलोमीटर अंतराबाहेर जाऊन मासेमारी करावी असा दंडक असूनही तो पाळला जात नाही असे या मासेमारानी सांगितल
रापणीत सापडला कचरा
सध्या रापणीत मोठ्या प्रमाणात मासे मिळत असले तरी कधी कधी मासे कमी आणि कचरा जास्त असे प्रकार होत आहेत. दोन दिवसांपूर्वी बाणावली येथे रापणीत फक्त कचराच सापडला अशी माहिती पेले फेर्नांडिस यांनी दिली. ते म्हणाले, रापणीत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कचरा सापडण्याच्या घटना हल्लीच घडत आहेत. सध्या किनारपट्टी सफाईचे कंत्राट एका एजन्सीला दिले आहे. कदाचित या कचरा नदीत किंवा समुद्रात फेकला जात असल्यामुळे हे प्रकार घडत असावेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यावर देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त केली.