आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे गोव्यात बंगले! सेवेत रुजू होताच उभी राहते मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 12:10 PM2024-07-02T12:10:27+5:302024-07-02T12:10:42+5:30
'सेकंड होम' म्हणून पसंती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात बदली होऊन येणारे आयएएस किंवा आयपीएस अधिकारी गोव्यात मालमत्ता खरेदी करतात. अशा अनेक अधिकाऱ्यांचेच नव्हे तर माजी राज्यपालांचेही बंगले राज्यात आहेत.
प्रशासनात जिल्हाधिकारी, खातेप्रमुख, सचिवापासून मुख्य सचिव पदावर काम करणारे आयएएस अधिकारी असोत किंवा पोलिस दलात उपअधीक्षकापासून डीजीपी पदावर काम करणारे आयपीएस अधिकारी असोत, गोव्यात बदली होऊन आल्यावर या शांत प्रदेशात स्वतःच्या मालकीचे आलिशान घर असावे हा मोह त्यांना आवरत नाही. अर्थात सर्वच अधिकारी अप्रामाणिकपणे किंवा गैरमार्गाने मालमत्ता खरेदी करतात, असे नव्हे. काही अधिकारी प्रामाणिकपणे मेहनतीच्या कमाईवरही बंगले, घरे, जमिनी खरेदी करतात. अनेकांनी गोवा हे आपले 'सेकंड होम' बनवले आहे.
माजी राज्यपाल मोहम्मद फाझल यांनी दोनापावला येथे आलिशान बंगला खरेदी केला. ते २६ नोव्हेंबर १९९९ ते ९ ऑक्टोबर २००२ या काळात गोव्यात राज्यपाल होते. मूळचे अलाहाबाद, उत्तरप्रदेशमधील फाझल यांचे ४ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले. विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी एका ५८ वर्षीय गोमंतकीय इंटेरियर डिझायनर महिलेशी गोव्यातील चर्चेमध्ये साध्या पद्धतीने विवाह केला. दोनापावला येथे 'तस्नीम फझल मॅन्शन' या बंगल्यात ते पत्नीसोबत राहत होते.
बार्देश, तिसवाडी, सासष्टीत अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी मालमत्ता खरेदी केली आहे. २००६ साली गोव्यात मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेले १९७६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी जे. पी. सिंग यांनी जुने गोवे येथे बंगला खरेदी केला आहे. माजी मुख्य सचिव किरण धिंग्रा यांचीही गोव्यात मालमत्ता आहे. गोवा कार्बन लि, कंपनीमध्ये त्या संचालक आहेत.
काही आयएएस अधिकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गोव्यातच राहायला बघतात. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना आर. के. श्रीवास्तव यांनी फाइल सरकवून स्वतःची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्तपदी करून घेतली. नंतर ही नियुक्ती वादाची ठरली तेव्हा त्यांना पद सोडावे लागले. माजी पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांचा पर्वरी येथे बंगला आहे. अशा अनेक माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी गोव्यात बंगले, फ्लॅट, जमिनी खरेदी केलेल्या आहेत.
गोवा म्हणजे मौजमजा करण्याचे ठिकाण असा गैरसमजही काही आयपीएस अधिकाऱ्यांनी करून घेतला आहे. गेल्या ऑगस्टमध्ये तत्कालीन डीआयजी ए. कोन यांनी बार्देश तालुक्यातील एका नाईट क्लबमध्ये तरुणीच्या केलेल्या विनयभंगाचे प्रकरण गाजले. त्यांना त्वरित डीआयजी पदावरुन हटवण्यात आले.
वादग्रस्त अन् मालमत्ता
खाण खात्याचे माजी सचिव राजीव यदुवंशी यांचा वेर्णा येथे बंगला आहे. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना यदुवंशी यांचा मोठा दबदबा होता. खाण प्रकरणात त्यांचे नाव चर्चेत आले होते. ईडीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आयएएस अधिकारी मुदस्सर हे मूळचे लखनोंचे, परंतु गोव्यात दोनापावला येथे बंगला खरेदी करून ते येथेच स्थायिक झाले. अनेक वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले.
मालमत्ता लपवण्याचेही प्रकार
१९६८ च्या अखिल भारतीय सेवा (आचरण) नियमानुसार प्रत्येक आयएएस अधिकाऱ्याने त्याची अचल मालमत्ता जाहीर करणे अनिवार्य आहे; परंतु एका पाहणीत असे आढळून आले आहे की, ३० टक्के आयएएस अधिकारी आपली अचल मालमत्ता जाहीर करतच नाहीत.