दाबोळी जंक्शनसमोरील महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात, 4 जण जखमी
By पंकज शेट्ये | Published: October 12, 2023 07:03 PM2023-10-12T19:03:58+5:302023-10-12T19:06:48+5:30
एक खासगी प्रवासी मिनीबस सुमारे २० प्रवाशांना घेऊन मडगावहून वास्कोच्या दिशेने येत होती.
वास्को: गुरूवारी (दि.१२) दाबोळी जंक्शनसमोरील महामार्गावर दोन प्रवासी बस आणि एक पार्क करून ठेवलेल्या ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या प्रवाशात तीन महीला आणि एका पुरूषाचा समावेश असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सकाळी ११.३० वाजता अपघात घडला. एक खासगी प्रवासी मिनीबस सुमारे २० प्रवाशांना घेऊन मडगावहून वास्कोच्या दिशेने येत होती. ती बस जेव्हा वालीस जंक्शनकडून दाबोळी जंक्शनच्या महामार्गावर पोचली त्यावेळी कदंब महामंडळाच्या प्रवासी बसने तिला ‘ऑव्हरटॅक’ करण्याचा प्रयत्न केला. कदंब महामंडळाच्या बस चालकाने जेव्हा मिनी बसला ‘ऑव्हरटॅक’ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोन्ही धावत्या बसचा एकमेकाला स्पर्श झाला. ‘ऑव्हरटॅक’ करणारी कदंब बस आपल्या मिनी बसला धडकणार असल्याचे चालकाला दिसताच त्यांनी बस डाव्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला. कदंब बस आणि मिनि बसची जोरात होणारी धडक वाचवण्यासाठी खासगी बस चालकाने बस डाव्या बाजूने घेतली असता त्याला समोर रस्त्यावर एक ट्रक पार्क असल्याचे दिसून आले.
चालकाने पार्क ट्रकला बसची धडक होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले, मात्र खासगी मिनी बसची धडक जाऊन पार्क ट्रकवर बसली. त्या अपघातात खासगी मिनी बसमध्ये प्रवास करणाऱ्या तीन महीला आणि एक पुरूष जखमी झाला. जखमी झालेल्या कुंदा विरनोडकर (वय ५४, रा: मडगाव), मंजूळा पाटील (वय २७ष रा: नवेवाडे - वास्को), अवरल सोझा (वय ३६, बोगदा - मुरगाव) आणि अरवींद कुमार (वय २३, रा: सडा) यांना त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्या अपघातात चौंघांनाही झालेल्या जखमा कीरकोळ असल्याने त्यांच्यावर उपचार करून नंतर त्यांना घरी पाठवले.
वास्को पोलीसांना अपघाताची माहीती मिळातच त्यांनी त्वरित तेथे दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच पोलीसांनी अपघाताचे प्रकरण नोंद केले असून पोलीस हवालदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.