पर्वरी महामार्गावर बसची कारला धडक; भीषण अपघातानंतर तासभर वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 13:39 IST2023-09-23T13:37:38+5:302023-09-23T13:39:07+5:30
सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.

पर्वरी महामार्गावर बसची कारला धडक; भीषण अपघातानंतर तासभर वाहतूक कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क पर्वरी : पर्वरी महामार्गावर प्रवासी बस आणि पर्यटक टॅक्सी यामध्ये धडक होऊन कारचा चक्काचूर झाला. शुक्रवारी (दि. २२) हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.
पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता राजू ट्रॅव्हल्सच्या बसने (जीए-०४ टी- ५९३१) समोरून येणाऱ्या इनोव्हा या पर्यटक टॅक्सीला (जीए- ०३ एन- ८०१०) जोराची धडक दिली. हा अपघात पर्वरी बाजारानजीकच्या सिडनी रोजारिओ हॉस्पिटलच्या जंक्शनवर घडला. वाळपई-पणजी मार्गावरील बसचालक नासिर हुसेन शेख (33, वाळपई) याने वेगाने बस चालवून मोपाहून पणजीला जाणाऱ्या इनोव्हा टॅक्सीला समोरून धडक दिली. त्यात इनोव्हाच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.
सुदैवाने बसमधील चार प्रवासी आणि इनोव्हा कारमधील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. बसचालक नासिर याला पर्वरी पोलिस स्थानकात आणून चौकशी करण्यात आली. त्याच्यावर भा.दं.सं. २७९, २३७ कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. अपघातानंतर पर्वरी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. निरीक्षक राहुल परब आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. हवालदार प्रीतम दाभोळकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.