म्हापशात व्यापारी एकवटले
By admin | Published: February 25, 2017 01:54 AM2017-02-25T01:54:27+5:302017-02-25T01:56:40+5:30
बार्देस : म्हापसा नगरपालिकेचे बाजारावर नियंत्रण नसून फेरी विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. ग्राहक व स्थानिक व्यापाऱ्यांना याचा
बार्देस : म्हापसा नगरपालिकेचे बाजारावर नियंत्रण नसून फेरी विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. ग्राहक व स्थानिक व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास होतो. बाजारातील सोपो कर वसुलीत मोठा घोटाळा दडलेला आहे. या अनागोंदीविरोधात म्हापसा व्यापारी संघटना येत्या सोमवारी, दि. २७ रोजी सकाळी १0 वाजता म्हापसा पालिकेवर मोर्चा नेणार असल्याचा इशारा शुक्रवारी देण्यात आला.
म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पालिकेच्या आशीर्वादाने सोपो कर गोळा करणाऱ्या व्यक्तीने मार्केटमधील मोकळ्या जागांवर बिगर गोमंतकीय व्यापाऱ्यांचा भरणा केल्याने बाजारात दुकानदारांपेक्षा फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हे लोक रस्ता अडवून बसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना आपला मालसुद्धा दुकानात नेणे कठीण होते. पालिकेने पार्किंग व्यवस्थेचे आश्वासन देऊनही त्याला हरताळ फासला. पालिकेच्या या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी सोमवारी व्यापारी संघटनेचे शिष्टमंडळ पालिकेवर मोर्चा नेणार आहे, असे शिरोडकर म्हणाले.
बिगर गोमंतकीयांच्या वाढत्या प्रस्थामुळे अनेक गोमंतकीयांनी आपली दुकाने त्यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. याला सर्वस्वी पालिकाच जबाबदार आहे. पालिका नेहमीच व्यापाऱ्यांवर आरोप करून व्यापाऱ्यांनीच बिगर गोमंतकीयांना आश्रय दिल्याचे सांगते.
शिरोडकर म्हणाले की, फेरीवाल्यांनी सोपो करानुसार रोज आपला माल परत न्यायचा असतो व दुसऱ्या दिवशी जागा मिळेल तिथे बसायचे असते; पण आता फेरीवाले शिल्लक माल तेथेच बंदोबस्तात ठेवून घरी जातात. दुसऱ्या दिवशी आपले दुकान खोलल्याप्रमाणे तेथेच ठाण मांडून बसतात. त्यांना कुणी विचारत नाही. चौकशी केली असता असे समजते की, त्यांनी ती जागा कोणाकडून तरी रोख पैसे देऊन विकत घेतलेली असते. बाजारातील अनेक रिकाम्या जागा पुन्हा कशा भरल्या, याची चौकशी पालिका मंडळाने करायला हवी.
म्हापशाचे नगराध्यक्ष संदीप फळारी किंवा इतर नगरसेवक म्हापसा बाजारात अधिकृतरीत्या फिरून पाहणी करत नाहीत. त्यामुळे बाजारातील घडामोडी आणि दुर्दशा त्यांना दिसत नाहीत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून जे कानावर येते, त्यावर ते विश्वास ठेवतात. बाजारातील गटारातून सांडपाणी वाहते. अनेक ठिकाणी गटारे उघडी असल्यामुळे दुर्गंधी पसरते. याची जाणीव त्यांना नसावी, असेही शिरोडकर म्हणाले.
म्हापसा बाजारात फेरीवाले, मसालेवाले व इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची अन्न आणि औषध खाते तपासणी करत नाही. मात्र, एफडीएचे कर्मचारी हॉटेलवाल्यांना येऊन सतावतात. मसाले विकणाऱ्यांच्या तराजूंची तपासणी केली जात नाही. व्यापाऱ्यांची नाहक सतावणूक होते, असे शिरोडकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला व्यापारी संघटनेचे सचिव आशिष कार्दोज, सदस्य श्रीपाद सावंत, अमर कवळेकर, नरेश तिवरेकर, श्रीपाद येंडे, गीतेश डांगी, महमंद मोतीवाला, नागेश मयेकर, अभिजित शिंदे, राजन पेडणेकर, रमेश गावस, पांडुरंग सावंत, सुधाकर गौडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)