लाच काळातच मालमत्ता खरेदी

By admin | Published: September 14, 2015 01:58 AM2015-09-14T01:58:29+5:302015-09-14T01:58:51+5:30

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव आणखी गोत्यात आल्याचे सूत्रांनी रविवारी स्पष्ट केले.

Buy property only after bribe | लाच काळातच मालमत्ता खरेदी

लाच काळातच मालमत्ता खरेदी

Next

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव आणखी गोत्यात आल्याचे सूत्रांनी रविवारी स्पष्ट केले. चर्चिल यांनी लाच घेतल्याचा आरोप असलेला काळ आणि त्यांनी मालमत्ता खरेदी केल्याचा काळ मिळताजुळता आहे. मालमत्ता खरेदी-विक्री दस्तऐवजांवरील तारखांत व्यवस्थित ताळमेळ बसत असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली. त्यामुळे चर्चिलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हा अन्वेषण विभाग (क्राईम ब्रँच) या प्रकरणात कसून चौकशी करत आहे.
चर्चिल यांचे प्राप्ती कर सल्लागार दयेश नाईक यांच्या कार्यालयावर गुन्हा अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. चर्चिल कुटुंबीयांच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली आहेत. त्यातील काही मालमत्ता या कथित लाचखोरीच्या काळात घेतल्याचे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या दस्तऐवजांवरून उघड झाले आहे.
वेर्णा येथे घेतलेला भूखंड, खरेदी केलेली एक बार्ज आणि इतर मालमत्तेच्या खरेदी-विक्री दस्तऐवजांमधील तारखा लाचखोरीच्या काळातील तारखांशी जुळत आहेत. बार्ज घेताना काढलेल्या डिमांड ड्राफ्टची माहितीही गुन्हा अन्वेषणला मिळाली आहे. खरेदी-विक्री दस्तऐवजांतील तारखा आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१० दरम्यानच्या आहेत. याच कालावधीत लुईस बर्जर कंपनीने लाच दिली होती, असे साक्षीदारांनी म्हटले होते.
दयेश नाईक यांच्या कार्यालयात सापडलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कोट्यवधीची मालमत्ता चर्चिल, त्यांचे पुत्र सावियो आणि पत्नी फातिमा आलेमाव यांच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. तशी कागदपत्रेही मिळाली आहेत. तसेच कॅसिनोतही त्यांची मोठी भागीदारी असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रेही झडती घेताना मिळाली आहेत. सावियो यांच्या नावावर असलेली मित्सुबिशीची महागडी पजेरो गाडीची कागदपत्रे त्यांना सापडलीत. चर्चिल यांच्या जामीन अर्जावरील निवाडा ठरलेला असताना दोन दिवस अगोदर टाकलेल्या छाप्यामुळे चर्चिलच्या गोटात चिंतेचे वातावरण वाढले आहे.

Web Title: Buy property only after bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.