मंत्रिमंडळ बदलाचा विषय नाहीच, त्या निव्वळ अफवा! मुख्यमंत्र्यांची 'लोकमत'ला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:24 PM2023-06-27T12:24:57+5:302023-06-27T12:26:20+5:30
व्यक्तिगत कामासाठी दिल्लीत
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यातील मंत्रिमंडळात काही बदल करण्याचा विषय नाही, मी व्यक्तिगत कामासाठी दिल्लीला गेलो होतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पुणे येथून 'लोकमत'शी बोलताना सांगितले व चर्चा आणि अफवांवर पडदा टाकला.
मुख्यमंत्री सावंत यांनी शनिवारी रात्री दिल्ली गाठली होती. ते रविवारीही दिल्लीत होते. त्यानंतर सोमवारी दिवसभर त्यांचे पुणे येथे दोन मोठे कार्यक्रम झाले. पुणे येथील सिम्बायोसिस संस्थेला त्यांनी भेट दिली व तेथील सुविधांची पाहणी केली. गोव्यात सिम्बायोसिसचा प्रकल्प यावा, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी संस्थेला दिले.
'लोकमत'ने पणजीहून मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला व गोव्यातील राजकीय चर्चाविषयी विचारले. मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रिमंडळाची फेररचना करावी, असा विषयच नाही. मी दिल्लीला राजकीय बैठकांसाठी गेलो नव्हतो. माझ्या व्यक्तिगत कामासाठी गेलो होतो. तेथून मग मी पुण्याला गेलो. मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावे किंवा कुणाला डच्चू द्यावा, असा विषय माझ्यासमोर दिल्ली भेटीवेळी नव्हताच. त्यामुळे त्याबाबत चर्चा करण्यात अर्थ नाही.
सूचक वक्तव्य करतीलच : तानावडे
मंत्रिमंडळात बदल होत असल्याच्या केवळ अफवाच आहेत. अजून तसे काहीही ठरलेले नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी म्हटले आहे. जेव्हा-जेव्हा मुख्यमंत्री दिल्लीला जातात तेव्हा-तेव्हा मंत्रिमंडळात बदलच्या अफवा पसरतात. मुख्यमंत्री वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेले आहेत; परंतु, त्याचा संबंध मंत्रिमंडळ बदलाशी लावून अफवा पसरविल्या जात आहेत. असे काही असल्यास मुख्यमंत्री सूचक वक्तव्य करतील; परंतु आताचा दिल्ली दौरा व्यक्तिगत असल्याचेही ते म्हणाले.