गोवा मंत्रिमंडळाची बैठक येत्या 31 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या घरी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 08:14 PM2018-10-27T20:14:40+5:302018-10-27T20:24:19+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अचानक आपल्या करंजाळे-दोनापावल येथील निवासस्थानी येत्या 31 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी 30 रोजी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानीच राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेणार आहेत.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अचानक आपल्या करंजाळे-दोनापावल येथील निवासस्थानी येत्या 31 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी 30 रोजी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानीच राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री गेले बरेच महिने मंत्रिमंडळाची बैठक घेऊ शकले नव्हते. फक्त सरक्युलेशन पद्धतीने अवघे काही प्रस्ताव मंत्र्यांकडून संमत केले गेले होते. मुख्यमंत्री गेल्या 14 रोजी दिल्लीतील एम्स इस्पितळातून गोव्यात आले. त्यानंतरही ते मंत्रिमंडळाची बैठक घेऊ शकले नव्हते. काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी शुक्रवारी सरकारवर जोरदार हल्ला चढविला व मुख्यमंत्री प्रतिसाद देत असल्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ द्या, अशी मागणी केली होती. भाजपाने अधिकृतरित्या देशप्रभू यांना शनिवारी उत्तर दिले नाही. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी हळदोणे येथे पत्रकारांशी बोलताना स्वत:च्यापरीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे व त्यांनी विश्रंती घेऊ द्या, असे विधान त्यांनी केले.
पर्रीकर यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असल्याचा संदेश फोनवरून शनिवारी सायंकाळी सर्व मंत्र्यांना दिला गेला. येत्या बुधवारी सायंकाळी पाच वाजता बैठक होईल. मंत्रिमंडळासमोर नेमके कोणते विषय मंजुरीसाठी येतील याची अजून अन्य मंत्र्यांना कल्पना नाही. साधारणत: चार-पाच महिन्यांच्या खंडानंतर आता मंत्रिमंडळाची बैठक होईल.
दरम्यान, राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) यापूर्वी झालेली बैठक वादग्रस्त ठरलेली आहे. आयपीबीच्या बैठका मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली व्हाव्या लागतात. यापूर्वी झालेली बैठक पर्रीकर यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली, असा दावा आयपीबीच्या काही सदस्यांनी केला. त्यावर विरोधकांकडून टीका झाली. तथापि, त्या बैठकीत फक्त आठच प्रस्ताव चर्चेस येऊन त्यावर निर्णय झाले होते. आता 30 रोजी आयपीबीच्या बैठकीत उर्वरित प्रस्तावांबाबत निर्णय होणार आहेत.