मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चा बोगस : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 07:40 PM2019-09-25T19:40:47+5:302019-09-25T19:41:00+5:30
सुभाष शिरोडकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल व त्यासाठी आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांना वगळले जाईल, अशा प्रकारची अफवा बुधवारी पसरली होती.
पणजी : मंत्रिमंडळाची फेररचना होईल अशा प्रकारच्या चर्चा किंवा अफवा ह्या बिनबुडाच्या म्हणजेच बोगस आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यालयातून बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली गेली आहे.
सुभाष शिरोडकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल व त्यासाठी आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांना वगळले जाईल, अशा प्रकारची अफवा बुधवारी पसरली होती. मंत्रिमंडळ बैठकीच्याच दिवशी अशा अफवेची पुडी कुणी तरी सोशल मिडियावरून बोगस पोस्टद्वारे सोडून दिली. त्यासाठी एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीचेही नाव वापरले गेले पण त्या वृत्त वाहिनीने ते वृत्त दिले नव्हते हे नंतर स्पष्ट झाले. कुणी तरी बोगस पोस्ट तयार केला होता. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर दिवसभर राजकीय क्षेत्रत अफवा पिकल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने निवेदन जारी केले व सगळ्य़ा चर्चा फेटाळून लावल्या.
सावंत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. विद्यमान सरकारकडे मोठे बहुमत आहे व मंत्रिमंडळाही योग्य प्रकारे काम करत आहे. सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न कुणी तरी संघटीत पद्धतीने करत आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा व मिडिया समुहांच्या नावांचा खोटा वापर केला जातो. समाजात गोंधळ निर्माण व्हावा या हेतूने हे केले जात असावे, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. मंत्रिमंडळ फेररचनेच्या सर्व अफवा कपोलकल्पीत व बोगस आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी चतुर्थीच्या काळात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या विषयी व त्यांच्या नगर नियोजन खात्याविषयीही सोशल मिडियावरून गंभीर स्वरुपाची बोगस पोस्ट काहीजणांकडून फिरविली गेली. त्या प्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी चौकशी करावी, अशी विनंती कवळेकर यांनी केली होती.