"काब्राल यांना मंत्रिमंडळातून काढल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:50 PM2023-11-27T15:50:54+5:302023-11-27T15:51:13+5:30
माजी प्रवक्ते तथा भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची नाराजी
पणजी : एवढी वर्षे पक्षाकडे निष्ठेने राहूनही निलेश काब्राल यांना मंत्रीपदावरून काढल्याने कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेलेला आहे, अशी नाराजी भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते सावियो रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "काब्राल हे भाजपसाठी अशा काळात वावरले की तेव्हा एखाद्या ख्रिस्ती नेत्याने या पक्षासाठी काम करणे मोठे कठीण होते. फुटीर काँग्रेस आमदाराची मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी काब्राल यांना मंत्रिमंडळातून डिच्चू दिल्याचे ऐकून मला फार धक्का बसला."
"दिवंगत पर्रीकर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पंतप्रधान मोदी यांच्यामुळे काहीजण पक्षात निष्ठेने राहिले त्यापैकी एक म्हणजे निलेश काब्राल होत. काब्राल यांनी कठीण प्रसंगी नेहमीच भाजपाची साथ दिली. ख्रिस्ती समाजाचे ते भाजपात प्रतिनिधित्व करीत होते. त्यांना काढून टाकल्याने ख्रिस्ती कार्यकर्त्यांमध्येही चुकीचा संदेश गेला आहे," असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांनी तसेच पक्षाने फेरविचार करावा यासाठी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतरांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.