कॅडेट, सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस : महाराष्ट्राचे वर्चस्व, गोव्याला कांस्य,
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 07:16 AM2017-12-17T07:16:19+5:302017-12-17T07:16:38+5:30
गोव्यात सध्या महोत्सवाचे दिवस आहेत. महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण पदकांची लयलूट करीत गोव्यात उत्सव साजरा केला. ७९व्या कॅडेट आणि सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तीन गटात बाजी मारली.
पणजी - गोव्यात सध्या महोत्सवाचे दिवस आहेत. महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण पदकांची लयलूट करीत गोव्यात उत्सव साजरा केला. ७९व्या कॅडेट आणि सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तीन गटात बाजी मारली. दुसरीकडे, यजमान गोव्याने कांस्यपदक पटकाविले.
गोवा टेबल टेनिस संघटना यांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित केलेली ही स्पर्धा ताळगाव येथील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम-ताळगाव येथे खेळविण्यात येत आहे. शनिवारी स्पर्धेतील सांघिक गटातील अंतिम लढती झाल्या. सब ज्युनियर मुलांच्या गटात, महाराष्ट्र अ संघाने पीएसपीबी अकादमीचा ३-२ ने पराभव केला. सब ज्युनियर मुलींच्या गटात पश्चिम बंगालचा ३-२ ने तर कॅडेट मुलींच्या गटात बंगालचा पराभव करीत बाजी मारली. कॅडेट मुलांच्या गटात तामिळनाडूने विजेतेपद कायम राखले. त्यांनी अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा ३-० ने पराभव केला.
स्पर्धेत गोव्याचा संघ भारताचा नंबर दोनचा खेळाडू शांतेश म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला होता. गोव्याच्या संघाला उपांत्य फेरीत तामिळनाडूने ३-१ ने पराभूत केले. तामिळनाडूच्या संघात भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू सुरेश राज प्रियेश याचा समावेश होता. गोव्याच्या कांस्यपदक विजेत्या संघात अॅरोन कुलासो, अद्वेत मुद्रा यांचा समावेश होता.
बक्षीस वितरण समारंभास गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष वेरो न्युनिस, आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्यवस्थापक एल. गणेशन, संदिप हेबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील वैयक्तिक गटातील सामने उद्यापासून सुरू होतील.
अंतिम निकाल असे : सब ज्युनियर मुले- महाराष्ट्र वि. वि. पीएसपीबीए ३-२. सब ज्युनियर मुली- महाराष्ट्र वि. वि. पश्चिम बंगाल ३-२. कॅडेट मुले-तामिळनाडू वि. वि. पश्चिम बंगाल ३-०. कॅडेट मुले-तामिळनाडू वि. वि. पश्चिम बंगाल ३-०. कॅडेट मुली-महाराष्ट्र वि. वि. पश्चिम बंगाल ३-०.