छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कळंगुट पंचायतीचे संस्थेला आदेश
By काशिराम म्हांबरे | Published: June 19, 2023 09:31 PM2023-06-19T21:31:02+5:302023-06-19T21:31:13+5:30
पुतळा हटवण्यासाठी १० दिवसांची कारणे दाखवा नोटीस पंचायतीकडून समितीला देण्यात आली आहे
म्हापसा - पंचायतीकडून कसल्याच प्रकारची परवानगी न घेता जून महिन्याच्या आरंभी कळंगुट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटवण्यात यावा असे आदेश कळंगुट पंचायत शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेला दिले आहेत.
शनिवार ३ जून रोजी रातोरात हा पुतळा कळंगुट येथील पोलीस स्थानकाला लागून असलेल्या शेजारील खुल्या जागेत रस्त्यावर शिवप्रेमींकडून या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली. ४ जून रोजी पहाटेपर्यंत पूतळ्याची उभारणी पूर्ण केली होती. पुतळ्याच्या उभारणीनंतर मंगळवारी ६ जून रोजी महाराजांचा शिवराज्यभिषेकचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता.
पुतळा हटवण्यासाठी १० दिवसांची कारणे दाखवा नोटीस पंचायतीकडून समितीला देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत पुतळा हटवण्यात आला नसल्यास पंचायतीकडून तो हटवण्यात येईल असा इशारा पंचायतीकडून या नोटीसद्वारे दिला आहे. पंचायतीचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्याकडे या संबंधी विचारणा केली असता संस्थेला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. पंचायतीकडून कोणत्याच प्रकारची परवानगी न घेता पूतळा उभारण्यात आला असल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे ते म्हणाले.
पंचायतीची परवानगी न घेता आज एका संस्थेकडून पूतळा उभारण्यात आला. उद्या दुसरी संस्था अशा प्रकारचे कृत्य करेल. पंचायत असे बेकायदेशीर प्रकार सहन करणार नाही. आपणही शिवाजी महाराजांचा आदर करतो पण बेकायदेशीर कृत्यास नाही असे सिक्वेरा यांनी माहिती देऊन सांगितले.