मोदींना बोलवा, पणजी स्मार्ट होईल : आपची टीका
By पूजा प्रभूगावकर | Published: October 26, 2023 12:51 PM2023-10-26T12:51:47+5:302023-10-26T12:51:58+5:30
स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली पणजी शहर फोडले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत.
पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पणजीत कार्यक्रम आयोजित केला, तरच शहरातील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होतील अशी टीका आमआदमी (आप)पक्षाचे नेता वाल्मिकी नाईक यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी करण्यासाठी पणजी शहराची निवड होऊन आठ वर्ष झाली. मात्र या काळात पणजी स्मार्ट झालीच नाही. उलट त्याची दुर्दशाच झाली. त्यामुळे च हेच काय ते ४० टक्के सरकारच्या अंतर्गत झालेला विकास असा प्रश्न त्यांनी केला आहे.
स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली पणजी शहर फोडले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत. मागील वर्षी सुध्दा स्मार्ट सिटीची कामे हाती घेतली होती. त्यावेळी सुध्दा अनेक मार्ग बंद ठेवले होते. त्यामुळे त्या मार्गांवर असलेल्या दुकानांमध्ये ग्राहक येत नसल्याने त्यांना आर्थिकदृष्टया मोठा फटका बसला होता. त्यानंतर जी २० परिषदे निमित सदर काम घाईगडबडीत पूर्ण केले. मात्र आता पुन्हा एकदा हे रस्ते फोडले आहेत.सदर कामे कधी पूर्ण होतील असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे या कामांना गती देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पणजीत कार्यक्रम आयोजित करावा. ते कार्यक्रमासाठी पणजीत आले तरच स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होतील, अन्यथा ती होणार नाहीत अशी टीका नाईक यांनी केली आहे.