गोव्यात गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च परिसरात निवडणूक प्रचाराला बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:45 PM2019-03-26T12:45:08+5:302019-03-26T12:54:05+5:30
गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च परिसरात प्रचाराला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. गोव्यात २३ एप्रिल रोजी लोकसभेची सार्वत्रिक आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे.
पणजी - गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च परिसरात प्रचाराला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. गोव्यात २३ एप्रिल रोजी लोकसभेची सार्वत्रिक आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. गुड फ्रायडे १९ एप्रिल रोजी असून त्या दिवशी चर्च परिसरात राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही. या दिवशी चर्च परिसरात प्रचार केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे राजकीय पक्षांनाही वाटते तसेच ख्रिस्ती बांधवांच्या भावना त्यामुळे दुखावल्या जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी आदेश काढून वरील बंदीचे निर्देश दिले आहेत.निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत राजकीय पक्षांनीही यावर आपली मते व्यक्त केली. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख कायदा-सुव्यवस्था असेल. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.
ईस्टर संडेला पोटनिवडणुका जाहीर केल्यानं ख्रिस्ती बांधवांमध्ये नाराजी
गोव्यात निवडणूक तारखांवरून ख्रिस्ती बांधवांमध्ये नाराजी आहे. लोकसभेच्या दोन जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या तीन तासांसाठी पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली असली तरी त्याआधी २१ एप्रिल रोजी इस्टर संडे आहे. राज्यात २७% ख्रिस्ती बांधव असून अल्पसंख्यांकांची मतदारसंख्या लक्षणीय आहे.
इस्टर संडे येशू ख्रिस्त जिवंत झाल्याचा दिवस म्हणून ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदाची पर्वणी असते. परंतु यंदा निवडणुकीनिमित्त 48 तास आधीच ड्राय डे लागू होणार असल्याने मद्याच्या वापरावर प्रतिबंध येईल. त्यामुळे हा आनंद सोहळा साजरा करता येणार नाही. ख्रिस्ती समाजामध्ये यामुळे नाराजी आहे. हा आठवडा पवित्र आठवडा म्हणून पाळला जातो. ड्राय डे असल्याकारणाने कार्यक्रमावर गदा येईल असे ख्रिस्ती बांधवांना वाटते. राज्यात ख्रिस्ती बांधव असून अल्पसंख्यांकांची मतदारसंख्या लक्षणीय आहे. ईस्टर संडे दिनी राज्यात ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन असते तिथे मद्याचा वापर करता येणार नाही.
ब्रेल लिपीतून मतदार स्लीप
दृष्टिहीनांसाठी यावेळी निवडणूक आयोगाने ब्रेल लिपीतील मतदार स्लीप उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर ब्रेल लिपीचे फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. यंत्रावर उमेदवाराचे नाव आणि निशाणी ब्रेल लिपीतही असेल.